नंदुरबार – ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमधील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत.

अक्कलकुवा येथे झालेल्या एका सभेत डॉ. गावित यांनी आमदार रघुवंशी यांना चंद्या आणि आमदार पाडवी यांना आमशो असे संबोधित केल्याची तसेच दोघांची मस्ती जिरवायची भाषा केल्याची चित्रफीत समाज माध्यमात फिरली. त्यामुळे संतप्त आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. गावित यांना देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा माजी मंत्री म्हणून डिवचले. इतक्या पापी माणसाने पाप करुनही त्याचे काहीच बिघडले नाही. तर आमच्या खोट्या तक्रारी करुन आमचे काय बिघडणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डाॅ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद नवा नाही. वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात जहरी टीका करणारे हे दोन्ही नेते आता जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपण महायुतीत असल्याचे विसरुन एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांनी मागील आठवड्यात अक्कलकुवा येथे कार्यकर्त्याच्या मेळाव्यात केलेले भाषण सध्या समाज माध्यमात फिरत आहे. या भाषणात त्यांनी शिंदे गटाचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी यांना लक्ष्य केले. दोन्ही आमदारांचा एकेरी उल्लेख करुन डाॅ. गावित यांनी आगामी निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला. मी कोणाला घाबरत नाही.

चंद्या आणि आमशो या दोघांवर माझे लक्ष आहे. या दोघांची मस्ती जिरवायची असल्याने पीएला सांगून यांची सर्व माहिती मागितली. आमदार आमश्या पाडवी हे करदाते असून यांच्या एकाच रेशनकार्डावर दोन पत्नींचे नाव आहे. त्यातील एका पत्नीच्या नावावर चार घरे तर दुसरीच्या नावावर १४ घरे आहेत. तरीदेखील त्यांना शबरी आणि पंतप्रधान योजनेचा लाभ देण्यात आला. याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिंदे गटाशी युती करायची नाही, असे वरिष्ठांना स्पष्ट सांगितले. हे किती लबाड आहेत, हे पक्षश्रेष्ठींना समजावून सांगेल. हे दोन्ही आमदार पुढील निवडणूकीत दिसणारही नाहीत. यांची वळवळ मीच बंद करणार, असे डॉ. गावित यांनी भाषणात म्हटले आहे.

दुसरीकडे, डाॅ. गावित यांच्या या टिकेला शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा माजी मंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावित परिचित असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील वाकयुध्दाने आता महायुतीमधील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महायुतीतील दोन ज्येष्ठ आमदार एकमेकांवर जहरी टीका करत असतांना पक्षश्रेष्ठी याबाबत मूग गिळून असल्याने त्यांची नेमकी भूमिका काय, असा संभ्रम दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांना दोन्ही बाजूकडील पक्षश्रेष्ठींचा छुपा पाठींबा आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमश्या पाडवी यांच्या पत्नींच्या नावे घरकुलासंदर्भात डॉ. विजयकुमार गावित यांनी केलेल्या टिकेला आमदार आमश्या पाडवी यांनी उत्तर देणे टाळले आहे. धडगाव तालुका दौऱ्यावर असलेल्या आमश्या पाडवी यांना याबाबत विचारले असता महायुतीमधील वादाबाबत पक्षश्रेष्ठींनी काहीही न बोलण्यास सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले.