नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून अपहरण झालेल्या सराफी व्यावसायिकाचा सोमवारी रात्री उशीरा शोध लागला असून त्याचे अपहरण करुन धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथील निर्मनुष्य जागेत सोडून देण्यात आले होते. पीडित रितेश पारेख यांनीच ही माहिती दिली.
शहादा शहरात राहणारे सराफी व्यावसायिक रितेश पारेख हे सोमवारी शहादा येथील घरुन सोने,चांदीच्या वस्तू घेवून म्हसावद येथील दुकानाकडे मोटारीने निघाले होते. ते पाडळदा बुडीगव्हाणमार्गे म्हसावदकडे जात असतांना सकाळी दहाच्या सुमारास एका मोटारीतून आलेल्या पाच जणांनी बंदुक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत रितेश यांचे त्यांच्या मोटारीसह अपहरण केले. रितेश हे म्हसावदकडे जात असतांना ते आपल्या बहिणीशी मोबाईलवरुन संवाद करत होते.
अचानक त्यांची मोटार फोडली गेल्याचा आणि काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने त्यांच्या बहिणीने त्यांच्या मोटारीचा अपघात झाला का, याची विचारणादेखील केली होती. मात्र काही क्षणात फोन करतो, असे सांगत रितेश यांनी फोटन बंद केला होता. त्यामुळे बहिणीचा संशय बळावला. त्यांनी घरी फोन करुन रितेश यांच्या पत्नीला याबाबत सांगितले. यानंतर कुटुंबियांनी फोन करुन शहानिशा केली असता रितेश म्हसावद येथील दुकानात पोहचलाच नसल्याचे उघड झाले.
कुटुंबियांना पाडळदा ते बुडीगव्हाण दरम्यान एका ठिकाणी मोटारीच्या फोडलेल्या काचा आढळून आल्या. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय बळावल्याने कुटुंबियांनी शहादा पोलीस ठाणे गाठले. दरम्यान रितेशला धुळे-अंमळनेर रोडवरील नवलनगरपुढे एका अज्ञातस्थळी दरोडेखोरांनी सोडून देत पलायन केले. रितेश यांना मारहाण करुन त्यांच्याकडे असलेली ३० किलो चांदी. २०० ग्रॅम सोने आणि सहा लाख रुपये रोख घेवून दरोडेखोरांनी पोबारा केला. रस्त्यावर येत रितेशने घरी फोन लावून आपण असलेल्या ठिकाणाचा पत्ता दिल्यानंतर पोलीस आणि त्याचे कुटुंबीय तिथे पोहचले. यानंतर रितेशवर उपचार करुन त्याला रात्री उशीरा शहादा पोलीस ठाण्यात आणण्यात आले .
या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली मोटार एका ठिकाणी सोडून दिल्याचे आढळून आले. मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. रितेशचे अपहरण करणारे नेमके कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. या घटनेने शहाद्यातील सुवर्ण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
