नाशिक – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सीएनजी बसचा वापर, इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत वाढ, प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण आदी कारणांनी स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये नाशिक शहराच्या कामगिरीत काहीशी सुधारणा दृष्टीपथास आली. परंतु, कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख कायम राखण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत देशातील १३० शहरांमध्ये झालेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे नुकतेच सन्मानित करण्यात आले. या सर्वेक्षणात १० लाखहून अधिक लोकसंख्येच्या गटात नाशिकने २०० पैकी १७८.४ गुण मिळवले. जे गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्यांनी जास्त आहे. सर्वेक्षण क्रमवारीत २०२४ मध्ये १९ व्या क्रमांकावर असणारे नाशिक चालू वर्षात १६ व्या स्थानी आले. नाशिकच्या क्रमवारीत काहिशी सुधारणा झाली.

तीन वर्षांपूर्वी निरी, टेरी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अभ्यासातून उद्योग, वाहतूक, रस्त्यांवरील धुळ, वीटभट्टया, बांधका, स्टोन क्रशर, सन्मानभूमी, बेकरी अशा जवळपास ११ क्षेत्रातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे शहर व ग्रामीण भागात हवेतील प्रदूषण वाढण्यास हातभार लागल्याचे समोर आले होेते. हवेतील प्रदूषण मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. हवेत धूळ, माती, धातू वा तत्सम सूक्ष्म व अतिसुक्ष्म कण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे धुके दाटल्याचा भास होऊन दृश्यमानता कमी होेते. अतिसुक्ष्म कण श्वसनातून मानवी शरिरात जाऊ शकतात. सुक्ष्म धुलीकण, इंधन वापरातून उत्सर्जित होणारे वायू यांचे मापन करून प्रदूषण वाढविण्यास कारक ठरलेले ११ घटक तेव्हा शोधण्यात आले होते. धुलीकण उत्सर्जनात उद्योग व वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले होते. धुलीकण व धोकादायक वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्यास नाशिकच्या हवेची गुणवत्ता उंचावता येईल याकडे तज्ज्ञांकडून लक्ष वेधण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून महापालिकेला आतापर्यंत ८७ कोटी रुपयांचा निधी मिळाला. विविध उपाय योजनांमुळे क्रमवारीत काहिशी सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सीएनजी बसेसचा अंतर्भाव झाला. पुढील काळात काही इलेक्ट्रीक बसचा समावेश होण्याच्या मार्गावर आहे. शहरात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असून त्यासाठी चार्जिंग केंद्राची उभारणी प्रगतीपथावर आहे. इलेक्ट्रीक बससाठी आगार, राडारोडाची विल्हेवाट, धूळ साफ करणारी यंत्रणा, सायकल पथ, अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी आदींचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजे अजून बराच मोठा पल्ला गाठणे बाकी आहे.