नाशिक : एकिकडे २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असताना नाशिक शहरात अजूनही काही भाग असे आहेत की, त्या ठिकाणी वीज पुरवठ्यासारख्या सुविधा सुरळीतपणे मिळत नाहीत. एखादे देयक थकल्यानंतर त्वरीत कार्यवाहीसाठी हालचाल करणाऱ्या महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत देण्यात येईल, याची कोणतीही हमी देण्यात येत नाही. चोवीस तासातील दहा तास जरी वीज पुरवठा खंडित असला तरी ग्राहकांना देयक भरणे भाग पडते.

ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यात महावितरण असमर्थ ठरत असल्याचा अनुभव पंचवटीतील अमृतधाम परिसराला दररोज येत आहे. शहरात राहूनही त्यामुळे एखाद्या खेड्यात राहत असल्याचा अनुभव या भागातील नागरिक घेत आहेत. बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत या भागात हाच त्रास पुन्हा एकदा सहन करावा लागला.

पंचवटीतील अमृतधाम, साईनगर, लक्ष्मीनगर, बळी मंदिर त्यापुढे धात्रक फाटा परिसर हा भाग कायमच महावितरणच्या असंतोषाचे कारण बनत आहे. या भागात अखंडपणे वीज पुरवठा झालेला दिवस दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी सद्यस्थिती आहे. वीज पुरवठा कधी गायब होईल आणि वीज पुरवठा पुन्हा कधी सुरु होईल, याविषयी कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याने विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक सर्वांची दररोज गैरसोय होत आहे. बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सहा ते सात वेळा वीज पुरवठा खंडित झाला.

दुपारी चारनंतर तासभर विजेच्या कमी-अधिक दाबामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला ग्राहकांना सामोरे जावे लागले. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे इलेक्टाॅनिक वस्तूंचे नुकसान होण्याचा धोका असतो. यासंदर्भात तक्रारीसाठी देण्यात आलेला आडगाव येथील भ्रमणध्वनी क्रमांक दिवसभर बंदच राहिला. त्यामुळे एका वरिष्ठाकडे काही ग्राहकांनी तक्रार केली असता, ते महाशय बुधवारी कामावर नसल्याचे समजले. त्यामुळे तक्रार नेमकी करावी तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडला.

या भागात दर शनिवारी दुरुस्तीच्या नावाखाली कित्येक तास वीज पुरवठा खंडित असतो. मागील शनिवारी तर सकाळी दहा वाजेपासून गायब झालेली वीज सायंकाळी सहाच्या सुमारास आली. महावितरणसाठी हा खेळ नेहमीचा झाला असला तरी त्यामुळे परिसरातील ग्राहकांना मनस्ताप होत आहे. एखाद्या खेडेगावातही विजेच्या बाबतीत असा अनुभव येत नसावा, अशी व्यथा ग्राहकांकडून मांडण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचवटीतील अमृतधाम भागात बुधवारी ३३ केव्हीएच्या वाहिनीत दोष निर्माण झाला होता. साईनगर फिडरला जोडणाऱ्या वाहिन्यांचे तीन ‘इन्सुलेटर’ खराब झाले. दुपारी सव्वा तीन वाजता ही घटना घडली. त्यामुळे अमृतधाम, बाफना बाजार सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. चेतन वाडे (कार्यकारी अभियंता, शहर एक, महावितरण)