नाशिक : शहरातील खड्डेमय रस्ते वाहतूक कोंडी आणि अपघाताचे कारण ठरत असताना महापालिकेकडून दुरुस्तीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. पंचवटीतील रासबिहारी चौकात महामार्ग आणि सेवा रस्त्याला जोडणाऱ्या भागात भलामोठा खड्डा पडल्याने अशीच स्थिती निर्माण झाली. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी खडीने स्वत: हा खड्डा भरून घेत वाहनधारकांसाठी रस्ता सुरक्षित केला.

महापालिकेच्या कारभाराने वाहतूक पोलिसांवर रस्त्यांवरील खड्डे भरण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटली. या संदर्भात महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. खड्डे दुरुस्तीची सद्यस्थितीही स्पष्ट झाली नाही. सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शहरासह औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यात साचणाऱ्या पाण्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. पावसात डांबरीकरणातून रस्ता दुरुस्ती, खड्डे बुजविण्याचे काम पुढे सरकले नव्हते. या काळात तात्पुरत्या मलमपट्टीचा मार्ग अवलंबला गेला. अशा प्रकारे बुजविलेले खड्डे पावसात उघडे पडतात. पावसाने उघडीप घेतल्यानंतर डांबर टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न होतो. खड्डेमय रस्ते लहान-मोठे अपघात आणि वाहतूक कोंडीला हातभार लावत आहेत.

बळी मंदिर, रासबिहारी चौकात सिमेंटचा महामार्ग आणि डांबरी सेवा रस्ता यांना जोडणाऱ्या ठिकाणी असाच खड्डा पडला होता. चारचाकी वाहनांच्या मागून जाणाऱ्या दुचाकीधारकांना तो लक्षात येत नव्हता. त्यामुळे काही वाहनधारक पडता पडता वाचले. खड्ड्यामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन बुधवारी दुपारी या चौकात कार्यरत वाहतूक शाखेचे विशाल भदाणे, सोपान पवार आणि संपत बोडके यांनी खडी घेऊन जाणारी मालमोटार थांबविली. संबंधितास काही खडी खड्ड्यात देण्याची विनंती केली. नंतर वाहतूक पोलिसांनी खडीने स्वत: खड्डा भरून घेतला. काही दिवसांपूर्वी मनपाने या खड्ड्याची मलमपट्टी केली होती. परंतु, तो पुन्हा तसाच झाल्याचे वाहतूक पोलीस सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्डे बुजविण्याचे जे काम महापालिकेचे आहे, ते करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे. नागरिकांनी महापालिकेच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला. अनेक रस्त्यांवर अशीच स्थिती असून खड्ड्यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.