नाशिक – युथ गेम्स स्पर्धा दिनांक २३ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पश्चिम आशियातील बहारीन येथे तिसरी युथ गेम्स स्पर्धा सध्या सुरु आहे. ३१ ऑक्टोबरला या स्पर्धेचा समारोप आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघात नाशिकच्या भूमिका नेहते या धावपटूचा समावेश आहे. २०० मीटर धावणे आणि ४ x १०० मीटर धावणे रिले या दोन प्रकारात भारतीय संघात तिची निवड झाली आहे. ही निवड सार्थ ठरवत भूमिकाने २०० मीटर धावणे प्रकारात वेगवान धाव घेत हे अंतर २४.४३ सेकंदामध्ये पूर्ण करून कांस्यपदक मिळविले. मिडले रिले या प्रकारात भूमिकाने रौप्यपदकाला गवसणी घालत दुहेरी यश संपादन करून नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.
मिडले रिले प्रकारात भूमिकाने आपल्या सहकारी एडविना जेसन, शौर्या अंबुरे आणि तन्नू यांच्या साथीने वेगवान धाव घेत हे अंतर २. १२. ०० मिनिटात पूर्ण करून रौप्य पदकावर आपले नांव कोरले. नाशिकच्या ॲथलेटिक्स खेळाडूंनी आतापर्यंत लांब पल्ल्याच्या शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व करून चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु, शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमी अंतराच्या २०० मीटर प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी भूमिका नेहते ही नाशिकची पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कमी अंतराच्या स्पर्धेतही नाशिकचे धावपटू कमी नाहीत, हे सिद्ध करून दाखवले आहे.
याआधी भूमिका नेहतेने भुवनेश्वर येथे ४० व्या कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेत अशीच धाव घेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण पात्र आहोत, हे सिद्ध केले होते. तसेच पाटणा येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्येही भूमिकाने २०० मीटर धावणे प्रकारात पहिला क्रमांक मिळविला होता.
भूमिका नेहते पाच वर्षांपासून एन.आय. एस. प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे नियमित सराव करत आहे. भूमिकाच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे नाशिकच्या धावपटूंमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. भूमिकांसह येथे सराव करत असलेले आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशीच चांगली कामगिरी करून नाशिकचा झेंडा जगामध्ये उंच करतील, असा विश्वास सिद्धार्थ वाघ यांनी व्यक्त केला.
भूमिका नेहतेच्या या उत्तम कामगिरीबद्दल नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे,सचिव सुनील तावरगिरी यांनी अभिनंदन केले. खेळडूंना अशी कामगिरी करता यावी यासाठी संघटना कायमच सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्न्यांमुळे यापुढेही नाशिकची अशीच प्रगती दिसून येईल, असेही हेमंत पांडे यांनी सांगितले.
