नाशिक – शहराच्या मध्यवर्ती भागातील बी. डी. भालेकर हायस्कुल जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. या जागेवर महापालिकेच्या वतीने विश्रामगृह बांधण्याचा निर्णय झाला. बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेत शाळेची आवश्यकता मांडण्यात आली. इमारत पाडा, पण त्या जागेवर अद्यावत शाळा उभी करा, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाला त्याजागी शाळा होणारच, असे आश्वासन देण्यात आले.
बी. डी. भालेकर ही माध्यमिक मराठी शाळेची इमारच पाडून त्याठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या शाळेस ऐतिहासिक वारसा आहे. शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. सरकारी अनास्थेमुळे शाळा बंद पडली. शाळा बंद झाल्यामुळे गरीब मुलांना दूरवारील शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक गैरसोय, शाळा सोडण्याचे प्रमाण आणि पालकांचा आर्थिक बोजा वाढला आहे.
शालेय इमारत पाडून याठिकाणी विश्रामगृह उभारण्यास बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीचा विरोध आहे. याबाबत विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे यांनी या ठिकाणी विश्रामगृह बांधण्यास दर्शविला आहे. मुलांना याठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळावे, ही मागणी आहे. शाळेच्या जागेचे आरक्षण हे शैक्षणिक कामासाठी असल्याने शैक्षणिक उद्देश सोडून इतर कोणत्याही कामासाठी या जागेचा वापर करू नये, अशी मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीच्या वतीने शनिवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. शाळेचे बांधकाम परीक्षण झाले आहे. शाळा जीर्ण अवस्थेत असून तिला पाडण्याशिवाय पर्याय नाही. शाळा पाडल्यानंतर त्या ठिकाणी शाळा व्हावी असे वाटत असल्याचे भुसे यांनी शिष्यमंडळाला सांगितले.
