जळगाव : भाजपच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर पक्षाने मंगळवारी जिल्हाध्यक्षांची तीन नावे जाहीर करत, दोन मराठा आणि एका गुर्जर समाजातील पदाधिकाऱ्यांना संधी देत जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपने जळगाव जिल्ह्यासाठी रावेर आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघानुसार पूर्व आणि पश्चिम असे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. तसेच जळगाव शहरासाठी स्वतंत्र महानगर जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे. पूर्व जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भाजपचे निष्ठावंत माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची नियुक्ती झाली आहे. ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी यापूर्वी लोकसभा क्षेत्र प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. चौधरी हे देखील मंत्री महाजन यांच्या जवळचे आहेत. जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
बाविस्कर आणि सूर्यवंशी हे मराठा समाजाचे असून, चौधरी हे गुर्जर समाजाचे आहेत. त्यामुळे तिघांच्या निवडीतून सामाजिक संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे. तीनही पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही पक्षासाठी सातत्याने काम केले असून, त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या वेळी भाजपने पूर्व विभाग तसेच जळगाव महानगरसाठी लेवा समाजाला संधी दिली होती. एकमेव पश्चिम विभागात मराठा जिल्हाध्यक्ष होते. यावेळी घेतलेल्या निर्णयातून भाजपने मराठा समाजाला झुकते माप देऊन गुर्जर समाजालाही बरोबर घेतले आहे. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत होण्याचा अंदाज पक्ष नेतृत्वाने बांधला आहे.