नाशिक : साधारणत: ४२ वर्षांपूर्वी मे महिन्यात नाशिकमध्ये १३२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी पावसाने या काळातील आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत आतापर्यंत १७०.७ मिलीमीटरची नोंद केली आहे. हवामान विभागाकडील नोंदींचा विचार करता आजवरचा हा सर्वाधिक पाऊस ठरला. १५ पैकी सहा तालुक्यांत उन्हाळ्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुढील चार दिवसात त्यामध्ये आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

मे महिन्याच्या प्रारंभी पारा उंचावण्याची चिन्हे दिसत असताना सहा तारखेपासून गारपीट आणि वादळी पावसाने वेगवेगळ्या भागात झोडपण्यास सुरुवात केली. सलग २२ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात तो हजेरी लावत आहे. वळिवाच्या पावसानंतर मान्सूनचेे राज्यात आगमन झाले. एरवी अनेकदा जून आणि जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागते. यंदा मात्र महिनाभर आधीपासून तो कोसळत आहे. हवामान विभागा्च्या माहितीनुसार मागील २४ तासात शहरात १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या हंगामात आतापर्यंत एकूण १७०.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले. मे १९८३ मध्ये नाशिकमध्ये १३२.२ मिलीमीटर या सर्वोच्च पावसाची नोंद झाली होती. ४२ वर्षानंतर या महिन्यात त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाल्याचे नोंदींवरून दिसून येते.

यंदा १० आणि २१ मे रोजी ३३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तोही एक वेगळा उच्चांक म्हणता येईल. कारण, २० मे १९४९ मध्ये एकाच दिवशी ६३ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा त्या दिवसांचे पाऊस हे त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे ठरले. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ मध्ये मे महिन्यात नाशिकमध्ये ५२.७ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा मे महिना संपण्यात आणखी चार दिवसांचा अवधी आहे. हवामान विभागाने ३० मेपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाची एकूण आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटमाथ्यावर कमी, समतल भागात अधिक

मे महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बागलाण (१२०.३ मिलीमीटर), नांदगाव (१११.३), पेठ (१०१.७), निफाड (११२.७), सिन्नर (१५३.४) आणि चांदवड तालुक्यात (१३५.४) या सहा तालुक्यात सरासरी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. विशेष म्हणजे, या सहापैकी निफाड आणि बागलाण यांचा अपवाद वगळता इतर चार तालुके अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात. मालेगाव तालुक्यात (७७.२), कळवण (६२.८), सुरगाणा (३९.६), नाशिक ((८६.८), दिंडोरी (८२.५), इगतपुरी (६०.५), येवला (९४), त्र्यंबकेश्वर (८४.३) आणि देवळा तालुक्यात सरासरी (७९.२) मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ज्या तालुक्यांत १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला, त्यातील काहींचा अपवाद वगळता उर्वरित घाटमाथा नसणारे आहेत. मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या घाट माथ्यावरील तालुक्यात तुलनेत कमी पाऊस झाल्याचे दिसते. उन्हाळ्यात जिल्ह्यात इतका विक्रमी पाऊस होण्याची प्रदीर्घ काळाताील ही पहिलीच वेळ आहे.