नियमित स्वच्छता, घराघरातील कचरा संकलनाचे नियोजन, शहराच्या सौंदर्यीकरणावर भर, सांडपाणी व्यवस्थापन आणि या उपक्रमात नागरिकांचे योगदान या बळावर देवळाली छावणी मंडळाने स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये देशभरातील ६२ छावणी मंडळातून प्रथम क्रमांक पटकावला. दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. दुसरीकडे स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकची घसरगुंडी झाली आहे.

हेही वाचा >>> मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक सप्तश्रृंगी देवीच्या चरणी

संरक्षण विभागाच्या मालमत्ता विभागाचे अजयकुमार, मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. रागेश, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक शहराला लागून देवळाली छावणी मंडळाचा परिसर आहे. शहरातून मंडळाच्या हद्दीत प्रवेश करताना रस्ते, हिरवीगार झाडे, स्वच्छता असे बदल लगेच जाणवतात. स्वच्छ देवळाली- सुंदर देवळाली व हरित देवळाली हे ब्रीद छावणी मंडळाने खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणले आहे. गतवर्षी देवळाली छावणी मंडळ देशपातळीवर चौथ्या स्थानी होते. यावर्षी सहभाग नोंदविताना आरोग्य विभागाने नियोजन केले. स्वच्छता कामात आमुलाग्र बदल करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत सातत्य, आठही वार्डांमध्ये घंटागाड्यांचे योग्य नियोजन, सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी कार्यान्वित केलेला शुध्दीकरण प्रकल्प, सौंदर्यीकरणात दाखविलेली कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर याची फलश्रुती या सन्मानात झाली. स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली छावणी मंडळाने सहा हजार पैकी ५४३३.८८ गुण मिळवत देशातील ६२ छावणी मंडळात प्रथम स्थान पटकावले. स्वच्छतेच्या शाश्वत प्रणालीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आली. प्लास्टिकमुक्त शाळांचा परिसर, अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा संकलनासाठी सायकलचा वापर. सफाई कामगारांचे परिश्रम यामुळे देवळाली छावणी मंडळाला हा गौरव मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये व आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> नाशिक : राज ठाकरे यांचे धार्मिक तीर्थाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकची घसरगुंडी
देशपातळीवरील स्वच्छ शहर सर्वेक्षणात पहिल्या पाच क्रमांकात येण्यासाठी धडपड करणारे नाशिक गेल्या वर्षीच्या १७ व्या स्थानावरून २० व्या स्थानावर फेकले गेले आहे. राज्यात नाशिकची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली. महानगरपालिकेने विविध पातळीवर बरेच प्रयत्न करूनही अपेक्षित यश साध्य झाले नाही. उलट आहे ते स्थानही डळमळीत झाले. प्रक्रियायुक्त मलजलाच्या विक्रीतून महसूल प्राप्त करण्याचा निकष मनपासाठी अडसर ठरला. महापालिकेने प्रक्रियायुक्त मलजल नदीपात्रात सोडण्याचा पाटबंधारे विभागाशी करार केलेला आहे. त्याचा महसूल त्या विभागास मिळतो. या संदर्भात पूर्वकल्पना देऊनही पाण्याच्या श्रेणीत मनपाला ८०० गुणांचा फटका बसल्याचे सांगितले जाते. दोन वर्षापूर्वी बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे राडारोडा खत प्रकल्पावर तात्पुरत्या स्वरुपात साठवला जात होता. जलसंपदा विभागाशी करार करून उणीव असलेल्या गटात चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे नियोजन केले जात आहे.