मालेगाव : केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्ते अक्षरशः उतावीळ झाल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेकांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर चक्क काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल हेच भाजपवासी झाले आहेत. गेल्या दीड वर्षात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मालेगावचे डॉ.तुषार शेवाळे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शिरीष कुमार कोतवाल यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची धुरा होती. यापूर्वी आठ वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात दोन निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळाले होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व पुन्हा काँग्रेस असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. नाशिक येथील वसंत स्मृती या पक्ष कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी कोतवाल व त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. यावेळी कोतवाल यांच्यासह माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, युवा नेते नरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोवर्धने आदी कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत होईल,असा दावा केला जात आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्याला चांदवडचे आमदार राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार,ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष यतीन कदम, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. या प्रवेशाच्या वेळी महाजन यांनी कोतवाल यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा खास उल्लेख केला. शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपवासी झाला आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात. आता यापुढे कोणत्याही पक्षात जाण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, असे महाजन म्हणाले. भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मोठा वाव आहे. आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. भाजपमध्ये तुम्हाला योग्य ते स्थान दिले जाईल, त्यामुळे हा शेवटचा पक्षप्रवेश राहील, असा विश्वास महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये आपण नाराज होतो व पक्ष नेतृत्वाकडून ही नाराजी दूर करण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे कोतवाल यांनी या पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना नमूद केले. हा पक्ष प्रवेश कोणत्याही स्वार्थासाठी नाही. तसेच त्यासाठी कोणत्याही अटी नाहीत तर, विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचेही कोतवाल म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉ.तुषार शेवाळे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे नाराज झालेले डॉ. शेवाळे यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ.शेवाळे यांनी पक्ष त्याग केल्यावर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने शिरीषकुमार कोतवाल यांच्याकडे सोपवली होती. आता तेही भाजपवासी झाल्याने काँग्रेसची दुसऱ्यांदा पंचाईत झाली आहे.