नाशिक – जनसुरक्षा विधेयकाविरोधात शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. आंदोलनासाठी जमलेल्या काहींनी मग महापालिका निवडणुकीसाठी परिचयपत्र भरून देण्याचाही मुहूर्त साधला.
जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी शहर काँग्रेस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहराध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांप्रमाणे दडपशाहीने जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकारने जनसुरक्षा विधेयक आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार संपविणारे तसेच लोकशाही पद्धतीने न्याय मागणाऱ्या सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे हे जनसुरक्षा विधेयक असल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. या विधेयकाद्वारे सामान्य जनतेचा मूलभूत अधिकार काढून घेण्याचा भाजप सरकारचा घाट आहे.
सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या आणि लोकशाही पद्धतीने सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी हे विधेयक मुद्दाम भाजप सरकार लादत असल्याचा आरोप शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी केला. यावेळी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, भाजप सरकारचा धिक्कार असो, संविधान झिंदाबाद, लोकशाही झिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलनात बबलू खैरे, स्वप्निल पाटील, उद्धव पवार, स्वाती जाधव आदी सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर अनेकांची पावले पक्ष कार्यालयात वळली. पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून परिचयपत्र भरून घेण्यात येत आहे. आंदोलन आणि निवडणुकीसाठी परिचयपत्र भरणे, हा मुहूर्त अनेकांनी एकाचवेळी साधल्याचे पहायला मिळाले. मागील महापालिकेत काँग्रेसचे सहा नगरसेवक होते. मधल्या काळात काही माजी नगरसेवक आणि नेत्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. महापालिका निवडणुकीत लोकसभा, विधानसभेप्रमाणे महाविकास आघाडी एकत्रित येईल की नाही याची स्पष्टता नाही. या परिस्थितीत महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात पक्षाकडे इच्छुक आहेत का, याची चाचपणी या माध्यमातून केली जात असल्याचे सांगितले जाते.
परिचय पत्राचे स्वरुप
आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसतर्फे परिचयपत्र अर्थात छापील स्वरुपातील अर्ज भरून घेतला जात आहे. ही प्रक्रिया पाच जुलैपासून सुरू झाली आहे. या छापील अर्जाद्वारे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, निवासस्थान, शिक्षण, नोकरी यासह धर्म, जात, पोटजात याची माहिती संकलित केली जाते. शिवाय, यापूर्वी निवडणूक लढविली होती का, असल्यास ठिकाण आणि मिळालेली मते, मतदार नोंदणी यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक, निवडणूक लढविण्याचे ठिकाण अर्थात प्रभाग क्रमांक, सध्या कार्यरत असलेल्या पक्षातील पद आदी प्रश्न या परिचय पत्रात आहेत.