नाशिक : भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण आदी विषयांवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी आणि अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, वसंत ठाकूर, सचिव राहुल दिवे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मनपाला ३५० हून अधिक जणांना भूसंपादनाचा मोबदला द्यायचा होता. प्राधान्यक्रम डावलून केवळ ११ बांधकाम व्यावसायिकांना ५५ कोटींचे वाटप करण्यात आले.

कुंभमेळ्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यांच्या नावाखाली मोठ्या ठेकेदारांनी शेतकरी असल्याचे खोटे पुरावे देऊन प्रशासनाच्या संगनमताने कोट्यवधींचा नफा खिशात घातल्याचा आरोप आंदोलकांनी केला. २४ वर्षात महापालिकेत भरती न झाल्यामुळे नागरी सुविधा पुरविताना अतिरिक्त ताण पडत आहे. आगामी कुंभमेळ्याआधी सर्व संवर्गातील पदे लवकर भरण्याची मागणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरीवाला क्षेत्राची निर्मिती, सफाई कर्मचाऱ्यांना न्याय, कुंभमेळ्यासाठी ५०० एकर जागेचे कायमस्वरुपी संपादन, सुरळीत पाणी पुरवठा, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून जागा निश्चिती, मोकळ्या जागांवर वाहनतळ उभारण्याची मागणी करण्यात आली. नदीत मिसळणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यासाठी सांडपाण्याच्या वाहिन्या बंद कराव्यात, कुंभमेळा नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय अध्यक्ष व नागरिकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मनपा प्रशासनाला दिले.