नाशिक : संततधारेमुळे पालेभाज्या आणि कोथिंबिरीचे मोठे नुकसान होत असून बाजार समितीतील आवक घटली आहे. परिणामी, चांगल्या दर्जाच्या मालाचे भाव कमालीचे उंचावले आहेत. कोथिंबिरीला सध्या ६० रुपये जुडीपर्यंत दर मिळत आहे. पालेभाज्यांची वेगळी स्थिती नाही. दुसरीकडे भिजलेली कोथिंबीर १० आणि २० रुपये जुडी दराने विकली जात आहे.

आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरू आहे. पावसामुळे मागील सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात पालेभाज्यांची आवक कमी झाल्याचे नाशिक बाजार समितीने साप्ताहिक समालोचन अहवालात म्हटले आहे. काही पालेभाज्यांचे दर वाढले. काही पालेभाज्यांचे दर कमी झाल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोथिंबिरीने उच्चांक गाठला होता. तेव्हा प्रति १०० जुडींना किमान दोन हजार, कमाल १० हजार ३०० आणि सरासरी आठ हजार ३०० रुपये असे दर मिळाले होते. म्हणजे तेव्हा घाऊक बाजारात ८३ रुपयांना कोथिंबीर विकली गेली. त्या तुलनेत आता भाव काहिसे कमी झाले. बाजार समितीत ३२ हजार ४०० जुड्यांची आवक झाली. गावठी आणि संकरित प्रकारातील या कोथिंबिरीच्या प्रती १०० जुड्यांना किमान ९०० ते कमाल सहा हजार आणि सरासरी ३३०० रुपये दर मिळाले.

पावसामुळे सध्या ओलसर माल बाजारात येत आहे. भिजलेला माल लवकर खराब होतो. कोरड्या मालास चांगले दर मिळतात. मुंबई आणि अहमदाबादपर्यंत पोहोचू शकेल, असा माल व्यापारी मुख्यत्वे खरेदी करतात. सहा सप्टेंबर रोजी कोथिंबिरीचे (प्रति शेकडा जुडी) सरासरी दर ८३०० रुपयांवर पोहोचले होते. म्हणजे चांगल्या प्रतीच्या कोथिबीरला प्रती जुडी ८३ रुपये दर मिळाले होते. दोन दिवसांत दर निम्म्याने कमी झाले. सोमवारी बाजार समितीत भिजलेल्या कोथिंबीरची पथारी पसरल्याचे पहायला मिळाले. माल दृष्टीपथास पडत असला तरी भिजलेल्या कोथिंबीरला दर मिळत नसल्याचे विक्रेते सांगतात. भिजलेला माल खराब होतो. यामुळे ग्राहक विचार करतात. हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेते ज्यांना लगेच ती वापरायची आहे, असे ग्राहक मुख्यत्वे ती खरेदी करताना दिसतात. सामान्यांनाही पावसात असाच माल खरेदी करावा लागत आहे.

पालेभाज्याही महागल्या

पावसामुळे कोथिंबीरप्रमाणे पालेभाज्याही महागल्या आहेत. बाजार समितीत मेथीच्या १२ हजार ६०० जुड्यांची आवक झाली. त्यास सरासरी (१०० जुड्या) दोन हजार म्हणजे प्रति जुडी २० रुपये दर मिळाला. कांदा पात (४६०० जुड्या) १८०० रुपये, शेपू (पाच हजार जुड्या) सरासरी साडेतीन हजार रुपये दर मिळाले. गणेश विसर्जनाच्या दिवशी मेथी आणि शेपू यांना सरासरी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये, कांदा पातला तीन हजार दर मिळाले होेते.