नाशिक : नाशिक-दिल्ली दरम्यान संध्याकाळी विमानसेवा अखेर सुरू झाल्यानंतर तिचे श्रेय घेण्यावरून नाशिक लोकसभेचे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार भास्कर भगरे यांच्यात जणू स्पर्धा लागली आहे. पहिल्या विमानाने या दोन्ही खासदारांनी एकत्रित प्रवास केला. मात्र आता या सेवेसाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दावा उभयतांकडून होत आहे.

नाशिक-दिल्ली दरम्यान सकाळी विमानसेवा आहे. परंतु, संध्याकाळी तशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचा मुद्दा नेहमी मांडला जातो. नाशिकहून दिल्लीला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संध्याकाळच्या सेवेला अखेर रविवारचा मुहूर्त लाभला. या दिवसापासून इंडिगो एअरलाईन्सने नाशिक-दिल्ली सायंकाळची सेवा सुरू केली.

या निमित्त विमानतळावर खा. राजाभाऊ वाजे आणि खा. भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम पार पडला. पहिल्याच दिवशी या दोन्ही खासदारांनी विमानाने प्रवासाचा योग साधला. एकत्रित प्रवास करणारे महाविकास आघाडीचे हे खासदार विमान सेवेचे श्रेय मात्र स्वतंत्रपणे घेत आहेत.

या सेवेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत होतो. मागील अधिवेशनात या संदर्भात तारांकीत प्रश्न मांडला. केद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन या सेवेची गरज समजावून सांगितली. इंडिगोसह डीजीसीएच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्याचे आ. राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे. याची दखल घेत मंत्र्यांनी इतक्या कमी वेळेत मागणी पूर्ण केली. दिल्ली विमानतळ आणि नाशिक विमानतळावर रात्रीचा स्लॉट अर्थात वेळ उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. संध्याकाळच्या नाशिक-दिल्ली विमान सेवेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक नोदणी होईल, अशी ग्वाही मी विमान कंपनीला दिली आहे, आणि त्याच अटीवर त्यांनी ही विमान सेवा सुरु करण्याचे मान्य केले. ही विमानसेवा नाशिकच्या व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास खा. वाजे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक-दिल्ली विमानसेवा नियमित सुरू व्हावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा केला. या प्रयत्नांना अखेर यश आले. त्याच विमानातून मी शेतकऱ्यांसाठी दिल्लीकडे निघालो. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहाण यांची भेट घेणार असल्याचे खा. भगरे यांनी म्हटले.