नाशिक : हजारो कोटींच्या थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा बँकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) छगन भुजबळ आणि माणिक कोकाटे या दोन मंत्र्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी जिल्हा बँक बुडविली. या नेत्यांची मुले आता निवडणूक लढतील आणि पुन्हा गोरखधंदा सुरू होईल, असे टिकास्त्र भुजबळ यांनी सोडल्यावर मंत्री कोकाटे गप्प बसले नाहीत. कोकाटे यांनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडे कर्ज येणे बाकी नसल्याने त्यांनी बँक बुडविली असे म्हणता येणार नाही, असे प्रत्युुत्तर दिले
सुमारे दीड ते दोन हजार रुपयांच्या थकीत कर्जामुळे नाशिक जिल्हा बँकेवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. बँकेने वापरात नसलेली मुख्यालयाची भव्य इमारत विक्रीस काढली आहे. थकबाकी वसुलीसाठी नव्या सामोपचार योजनेला अलीकडेच मान्यता दिली गेली. जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा या बँकेचे माजी अध्यक्ष माणिक कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. बँकेवर प्रशासक नियुक्त आहे.
या काळात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला. एकेकाळी नाशिक जिल्हा बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. सर्वपक्षीय नेत्यांनी ती बुडविली. त्यामुळे आता या बँकेची निवडणूक घेता कामा नये. कारण, ज्यांच्यावर ठपका ठेवला गेला, त्यांचे भाऊ, मुले निवडणूक लढण्यास तयार होतील. पुन्हा तोच गोरखधंदा सुरू होईल.
यामुळे बँक कधीही सुस्थितीत येऊ शकणार नसल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. सर्व राजकीय नेत्यांनी जिल्हा बँक बुडविण्याचे काम केले. आता प्रशासकीय कामकाजात कुठेही हस्तक्षेप न करता प्रशासकांना त्यांचे काम करू द्यावे, असे त्यांनी ठणकावले.
कोकाटेंकडून प्रत्युत्तर
भुजबळांचे आक्षेप राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी खोडून काढले. बँकेला निवडणूक परवडणाऱ्या नसून त्या घेऊ नयेत, असे आपलेही मत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडविली हा आरोप मात्र चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. भुजबळांचा कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो.
राजकीय पुढाऱ्यांकडे कर्ज येणे बाकी नाही. काही चुकीचे निर्णय, अनावश्यक कर्जवाटप आणि वसुली न झाल्यामुळे बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे बँक राजकीय नेत्यांनी बुडविली, असे म्हणता येणार नसल्याचा दावा कोकाटे यांनी केला. बँक सुरळीत राखण्यासाठी प्रशासक असावा, ही आपलीही धारणा असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले.