नाशिक : खासगी वाहनाचा वापर टाळून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायी, सायकल व सार्वजनिक वाहनाने गाठलेले जिल्हाधिकारी कार्यालय. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिधान केलेला फिकट निळ्या रंगाचा सदरा आणि काळ्या रंगाची विजार तर, फिकट पिवळ्या रंगाची साडी वा याच रंगाच्या सलवार कमीजमध्ये कार्यरत महिला अधिकारी-कर्मचारी. बहुतेकांच्या गळ्यात ओळखपत्र…

नववर्षात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी विशिष्ट पेहरातावातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील रंग बदलले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्याच्या पहिल्या दिवशी गणवेश तसेच इंधनाचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यास सांगण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. या उपक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी तथा महापालिका आयुक्त मनिषा खत्री या देखील सहभागी झाल्या. उभयतांनी पायी आपापले कार्यालय गाठले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे हे रिक्षातून तर तहसीलदार अमोल निकम हे सायकलने पोहचले.

हेही वाचा : नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या उद्यापासून परीक्षा

सर्वच अधिकारी गणवेशात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे रुप पालटले. या ठिकाणी विविध कामांसाठी नागरिक येतात. त्यांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख होण्यासाठी गणवेशाचा उपयोग होईल. त्यांचे नाव, पदनाम ज्ञात होण्यासाठी नववर्षात कर्मचारी ओळखपत्राचा दैनंदिन वापर करू लागले. ना वाहन दिवस उपक्रमातून प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला जात आहे.

पदभ्रमंतीत भेट

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी महापालिका आयुक्त मनिषा खत्री या देखील सहभागी झाल्या. सकाळी साडेनऊ वाजता त्र्यंबक रस्त्यावरील शासकीय निवासस्थानापासून दोघेही पायीच निघाले. रस्त्यात त्यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक भेटले. त्यांनीही काही काळ त्यांच्यासमवेत पायी भ्रमंती केली.

हेही वाचा : जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरणारी महिला ताब्यात, मूल होत नसल्याने उच्चशिक्षित संशयिताचे कृत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायी चालणे वा सायकलचा वापर यामुळे केवळ प्रदूषणच कमी होत नाही तर, आरोग्यही सुधारते. ना वाहन दिवस (नो व्हेईकल डे) उपक्रमास मनपा कार्यालयातही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्या दैनंदिन कामासाठी पायी चालणे पसंत केले. शासन-प्रशासनाच्या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणस्नेेही जीवनशैलीबाबत जागरुकता निर्माण होऊन भविष्यात या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.

मनिषा खत्री (आयुक्त, महानगरपालिका)