नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात नाशिक विभाग राज्यात पाचव्या स्थानावर राहिले आहे. विभागाचा निकाल ९३.०४ टक्के लागला. मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्के घसरला. यंदा दहावीचा निकाल अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने लवकर जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा जोमदार कामगिरी केली आहे.

विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चारही जिल्ह्यातून एक लाख ९८,७०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ९७,०१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक लाख ७९, ४७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात नाशिक जिल्हा (९५.३८) अग्रस्थानी तर, धुळ्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८७.१० टक्के लागला. जळगाव ९३.९७ आणि नंदुरबारचा निकाल ८८.१९ टक्के लागला. ऑनलाईन निकालानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लवकरच अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात होईल. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज १४ ते २८ मे या कालावधीत स्वीकारले जाणार असून प्रतिविषय ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा मार्चमध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण नको यासाठी वेळापत्रकात प्रमुख विषयाच्या परीक्षेआधी आधी एक दिवस सुट्टी देण्यात आली होती. परीक्षा काळात येणारे नकारात्मक विचार घालविण्यासाठी राज्यभर दहा समुपदेशकांची नियुक्ती करत मदत वाहिनीच्या माध्यमातून परीक्षेत येणाऱ्या अडचणी, अभ्यासाचे नियाेजन यासह वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा काळात कॉपीमुक्त अभियानासाठी प्रयत्न करण्यात आले.

मंगळवारी तांत्रिक अडचणींमुळे निकाल पाहण्यासाठी खोळंबा झाला. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर नेहमी शाळानिहाय निकाल यादी येते. यंदा मात्र ही पध्दत बदलल्याने मुख्याध्यापक, शिक्षण संस्था चालक यांचा निकाल पाहतांना गोंधळ उडाला. याद्या प्रसिध्द न झाल्याने शाळेचा किती टक्के निकाल लागला, विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी शोधण्यात वेळ गेल्याने बहुतांश शाळांचे निकाल उशीराने जाहीर झाले.

राज्यात नऊ विभागातून नऊ हजार ६७३ अपंग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या पैकी आठ हजार ८४४ उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९२.२७ टक्के इतकी आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे. एकूण ६२ विषयांची परीक्षा झाली. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. सवलतीच्या गुणांचा विचार केल्यास क्रीडा, छात्रसेना, ऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यानुसार दोन लाख ४६,६०२ पात्र विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला, क्रीडा यापैकी अत्युच्च एका क्षेत्रासाठी सहभागाचे, प्राविण्याचे गुण देण्यात आले.