नाशिक : अन्न व औषध अधिकारी असल्याचे खोटे सांगून मालवाहतूक वाहने अडवून लुटमार करणाऱ्या तीन जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येवला टोलनाका येथे चार जणांनी मालवाहू वाहनासमोर मोटार आडवी करुन चालकास अन्न व औषध विभागाचे अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. सुपारी भरलेली वाहने सातपूर येथील उद्योग भवन परिसरात आणण्यास सांगितले. चालकाकडून वाहनाच्या चाव्या, कागदपत्रे जबरीने ताब्यात घेतले. याविषयी तक्रारीनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा एकच्या वतीने या घटनेचा तपास केला जात असताना संशयित काळ्या रंगाच्या मोटारीतून गरवारे पॉइंट येथून अंबड लिंकरोडने पावर हाऊसकडे जाणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचत मोटारीतील चारूदत्त भिंगारकर (३७, रा. आदित्य नगर), मयूर दिवटे (३२, रा. बुधवार पेठ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटार, भ्रमणध्वनी असा चार लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील तिसरा संशयित नवीन सोनवणे (३५,रा. कमोदनगर) हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयितांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले