शहरातील एका रुग्णालयात बसविलेली अग्निशमन यंत्रणा योग्य असल्याचा दाखला देण्यासाठी गुरूवारी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिका मुख्य अग्निशमन केंद्राचा केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसात लाच घेताना पकडलेला महापालिकेचा हा दुसरा कर्मचारी आहे. नव्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा आणि उद्वाहनाबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडून मिळवावे लागते. त्यावेळी पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा होत असते. या कारवाईने त्यावर प्रकाश पडला आहे.
तक्रारदाराचे इंदिरानगरच्या सुचेतानगर भागात रुग्णालय आहे. या ठिकाणी मुंबईच्या दाह शामक खासगी कंपनीच्या वतीने नवीन अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली आहे. नवीन इमारतीत ही यंत्रणा महापालिकेच्या नियमावलीनुसार बसविली आहे की नाही, याविषयी अग्निशमन विभागाकडून दाखला मिळवावा लागतो. त्या अनुषंगाने तक्रारदाराने महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातील केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागीकडे संपर्क साधला होता. त्यावेळी बैरागीने संबंधित यंत्रणेची पाहणी करून ना हरकत दाखला देण्यासाठी पाच हजाराची मागणी केली. ही रक्कम ज्या कंपनीमार्फत हे काम केले, तिचा कर्मचारी महादेव करलकर याच्यामार्फत देण्यास सांगितले. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्रात ही रक्कम स्वीकारत असताना बैरागीला पथकाने अटक केली. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागातील लिपिक शेखर कावळेला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईमुळे अग्निशमन दलासह पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.