नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण २९ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत मुलगा सत्यजितचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपच्या काही इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी या पक्षाने त्यांना एबी अर्ज दिलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात एकाही राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. शह-काटशहाच्या राजकारणात पदवीधरच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नसण्याची ही पहिलीच वेळ असावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “…म्हणून मला शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला”, सत्यजीत तांबेंनी सांगितलं कारण

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत गुरूवार हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे या दिवशी पाच जिल्ह्यातील इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी विभागीय महसूल कार्यालय गजबजून गेले होते. नाट्यमय राजकीय घडामोडींनी रंगत चांगलीच वाढली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. मात्र त्यांनी अर्ज न भरता ऐनवेळी माघार घेतली. त्यांनी मुलगा सत्यजित याचा अपक्ष म्हणून अर्ज भरला. डॉ. तांबे यांच्या निर्णयाने काँग्रेस व पर्यायाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात राहिला नाही. सत्यजित तांबे यांनी अर्ज भरल्यानंतर आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला. परंतु, या नाट्याचा कर्ताकरविता भाजप असल्याची चर्चा होत आहे. धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी भाजप आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. परंतु, पक्षाने त्यांना एबी अर्ज दिलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार नाही. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) यांनी उमेदवाराचा विचारही केला नव्हता. वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे, हिंदुस्तान जनता पार्टीकडून दादासाहेब पवार या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी त्यांच्याकडे एबी अर्ज आहे की नाही याची निवडणूक यंत्रणेकडून स्पष्टता झाली नाही. एकंदर चित्र पाहता निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहणार आहे.

हेही वाचा- नाशिक : त्र्यंबक देवस्थान शुक्रवारपासून दर्शनासाठी खुले

या मतदारसंघातील निवडणुकीचा इतिहास बघता आजवर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार रिंगणात राहिले होते. यावेळी ही पहिलीच निवडणूक अशी आहे की, तिथे एकाही राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. सत्यजित तांबे यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या स्थितीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीची फरफट होईल. निवडणुकीसाठी अंतिमम मुदतीत पाच जिल्ह्यातील एकूण २९ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा- तुम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक दिवसांपासून…”

आज छाननी

दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी होणार आहे. माघारीसाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. या मुदतीनंतर उमेदवारांना प्रचारास १२-१३ दिवसांचा अवधी मिळणार आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे. तर दोन फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik graduate election will be held without candidates of national parties dpj
First published on: 12-01-2023 at 20:12 IST