अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या छाननीमध्ये सात उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता २१ उमेदवारांचे २७ उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीत अखेर २८ उमेदवारांनी आपली ४० नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. या सर्व नामनिर्देशन पत्रांची शनिवारी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी छाननी केली. सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले त्यामुळे निवडणुकीसाठी आता २१ उमेदवार पात्र ठरले आहेत.
हेही वाचा : “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दाखल सुनील तटकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने अनिकेत तटकरे यांनी दाखल केलेला डमी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. तर उर्वरित सहा उमेदवारांचे अर्ज शपथपत्र अपुरे असल्याने अवैध ठरले. अनिकेत सुनील तटकरे ( नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), नरेश गजानन पाटील(अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद ठरवण्यात आले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना २२ एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.