नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शहराला जोरदार तडाखा दिला. अनेक भागात झाडे उन्मळून पडली. झाडांखाली दबून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले. रात्रीपासून बुधवारी दिवसभर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. याची झळ शिवाई इलेक्ट्रिक बसलाही बसली. चार्जिंग नसल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

सलग दोन दिवसांपासून ग्रामीण भागात हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने बुधवारी शहरास तडाखा दिला. दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अकस्मात सुरू झालेल्या पावसाने छोट्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग इतका होता की, फलक, ताडपत्री असे साहित्य उडून गेले. सुमारे ४५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली. ५० हून अधिक ठिकाणी झाडे पडणे, फांद्या कोसळणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या. काही ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळून नुकसान झाले. कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

सकाळी गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानासमोर एका मोटारीवर झाड कोसळले. काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली. अग्निशमनच्या जवानांनी धाव घेत रस्त्यावरील अडथळा दूर केला. भद्रकालीतील बागवानपुरा, निर्मला शाळेजवळ, भोसला चौक, वडाळा गाव, सिडकोतील विजयनगर, नाशिकरोडमधील मोटवानी रोड, वैभव कॉलनी, विजयनगर, गोसावी वाडी, मोरवाडी गाव, तोफखाना केंद्र रोड, सावरकरनगर, खुटवडनगर वेद मंदिरासमोर, धोंगडेनगर, केटीएचएम महाविद्यालयासमोर अशा अनेक भागात झाड पडल्याच्या तक्रारी आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

वीज पुरवठा विस्कळीत

वादळी पावसात अनेक भागात रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला. पहाटे काही भागात तो पूर्ववत झाला. परंतु, नंतर पुन्हा दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहिला. दुपारी वादळाने अनेक भागात झाडांची पडझड झाली. त्याच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीज गायब झाली. काही ठिकाणी महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने विविध कारणांमुळे विद्युत यंत्रणेमध्ये व्यत्यय येतो. जोरदार वाऱ्यामुळे आदल्या दिवशी जेलरोडवरील पंचक उपकेंद्रातून येणाऱ्या विद्युत वाहिनीवर फलक अडकल्याने मुक्तीधाम आणि देवळाली कॅम्प या उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कर्मचाऱ्यांनी फलक काढला. विद्युत वाहिनीवरील तारावर अडकलेला फलक काढण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांना कसरत करावी लागली. वादळी वारा आणि पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारा, वीज कोसळून तसेच तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते, त्यानंतर महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

चार्जिंगअभावी इलेक्ट्रिक बस जागेवरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंडित वीज पुरवठ्यामुळे नाशिक-पुणे शिवाई इलेक्ट्रिक बसची चार्जिंग झाली नाही. दुपारी साडेचार वाजेपासून स्थानकात प्रवासी बसची प्रतिक्षा करीत होते. परंतु, एसटी महामंडळाकडून कुठलीही सूचना दिली गेली नाही. विचारणा केल्यावर बसची चार्जिंग झाली नसल्याचे सांगितले गेले. पुढील प्रवासासाठी शिवनेरीने जावे लागेल अथवा एक तासानंतर शिवाई बस येईल, असे सांगितले गेले. बस चार्जिंंग नसल्याचे आधीच सांगितले असते तर प्रवाशांनी पयार्यी मार्ग स्वीकारला असता. बस जार्चिंग नसेल तर प्रवाशांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. उशिराने ही माहिती समजल्याने नाहक ताटकळत राहावे लागल्याची संतप्त भावना प्रवाशांमध्ये उमटली.