नाशिक: इंदिरानगर बोगद्याजवळील भुजबळ फार्म चौकात गुरुवारी रात्री २५ वर्षाच्या एका मद्यधुंद महाविद्यालयीन हिंदी भाषिक तरुणीने धिंगाणा घातला.बोगद्याजवळील मार्गिकेवरून जाणाऱ्या वाहनांना थांबवत तिचा धांगडधिंगा सुरू होता. महाराष्ट्र पोलीस काय करतील बघते मी, असे आव्हान ती देत होती. अंबड पोलिसांनी तिला ताब्यात घेत समज देत सोडून दिले.
शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक शिक्षण दिले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पालक दूर असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसतो. काही महिन्यांपूर्वी इंदिरानगर येथील साईनाथ पोलीस चौकीनजीक एका व्यावसायिक संकुलाच्या गच्चीवरून महाविद्यालयीन युवतीने उडी घेत आत्महत्या केली होती. गंगापूर रोडवरील एका क्लबबाहेर मध्यरात्री मद्याच्या नशेत हिंदीभाषिक युवतीने अश्लील भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली होती.
परप्रांतीय काही विद्यार्थ्यांच्या अशा बेताल वागण्यात गुरूवारी रात्री एका तरुणीने भर टाकली. पश्चिम बंगालमधील २५ वर्षीय विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. या विद्यार्थिनीने मद्याच्या अमलाखाली भररस्त्यात गोंधळ घातला. तरुणीच्या हातात कैची होती. तिच्या बॅगेत दारूच्या बाटल्या सापडल्या. तिने बाटली उघडून भररस्त्यात पिण्यास सुरुवात केली. काही वेळात तिच्या तीन-चार मैत्रिणी घटनास्थळी आल्या. तिला समजावत घरी नेत असल्याचे दाखवत घटनास्थळावरून सर्वजणी पसार झाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे.
याविषयी अंबड पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत त्या मुलीला अंबड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नशा उतरल्यानंतर तिला समज देत सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी वेळेवर मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली असतानाही पोलीस उशिरा पोहोचले. पोलिसांना पाहताच तरुणीला तिच्या मैत्रिणींनी गाडीत बसवून घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी कोणतीही तत्काळ कारवाई केली नाही. सार्वजनिक शांतताभंग, पोलिसांविषयी असभ्य वर्तन, रस्त्यात दारू पिणे, यासारख्या गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाईची मागणी होत आहे.