नाशिक – जैन मंदिरातून मूर्ती, दानपेट्या चोरून नेल्या प्रकरणी तीन संशयितांना साडेतीन लाखहून अधिक किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखा एकने ही कामगिरी केली. संशयितांच्या चौकशीत बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील रोकड चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.

शरणपूर रस्त्यावरील सुमती सोसायटी परिसरात जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंच धातुच्या मूर्ती तसेच पुजेची भांडी, दोन दान पेट्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. हा प्रकार संवेदनशील तसेच धार्मिक भावनांशी निगडीत असल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली होती. गुन्हे शाखा एकच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील चोरीची भांडी एका गोणीत घेऊन दोन व्यक्ती दुचाकीवरून चांदशी गावाकडून आसाराम बापु पुलावरून नाशिककडे येणार आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व अन्य पथकाला सूचना दिल्या.

आसाराम बापू पुलावर सापळा रचण्यात आला. यावेळी एका दुचाकीवर दोन संशयित आले. त्यांची चौकशी केली असता विशाल सांगळे (२३, राहुलनगर), शिवा डोंगरे (२३, कामगार नगर) असे नाव सांगितले. त्यांची तपासणी केली असता संशयितांकडे गुन्ह्यातील मुद्देमाल सापडला. त्यांची सखोल चौकशी केली असता साथीदार लकी भंडारे (१९, ख्रिश्चन वाडी) यांच्या मदतीने जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरीत वापरलेली दुचाकी आणि गुन्ह्यात चोरीस गेलेल्या वस्तू असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, तिघांची एकत्रित चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी स्वामी डेव्हलपर्सच्या कार्यालयात रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून तेथील ६४, ५०० रुपये हस्तगत करण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये तीन लाख ५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहे.

तिन्ही संशयित भुरटे चोर असून केवळ मौज मजेसाठी चोरी करीत होते. रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे आणि चोऱ्या करायच्या, असा त्यांचा उद्योग होता. जैन मंदिरातील दानपेट्यांमध्ये पैसे जास्त असतात, या ऐकीव माहितीवर त्यांनी शरणपूर रस्त्यावरील जैन मंदिरात चोरी केली तर, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काहीतरी नक्की मिळेल, या हेतुने चोरी केल्याचे तपासात समोर आले. हे पैसे त्यांनी चैनीच्या वस्तू खरेदीसाठी वापरले.