नाशिक – गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी हे सर्वाधिक क्षमतेचे धरण. या धरणातून अतिवृष्टीच्या काळात यंदा तीन लाख सहा हजार क्युसेक इतका विक्रमी विसर्ग करण्याची वेळ आली होती. मराठवाड्यात अतिवृष्टी सुरू असताना गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागात म्हणजे नाशिकमध्ये वेगळी स्थिती नव्हती. परिणामी, नाशिकमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. पावसाच्या संपूर्ण हंगामात नाशिकमधून जायकवाडी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरेल इतके पूरपाणी प्रवाहीत झाले.

पाटबंधारे विभाग ३० सप्टेंबर हा पावसाच्या हंगामाचा अखेरचा दिवस मानते. सर्व धरणांतील जलसाठ्याचे नियोजन या तारखेच्या आधारावर केले जाते. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने ९२ हजार ८०२ दशलक्ष घनफूट म्हणजे तब्बल ९३ टीएमसी पाणी वाहून गेले. गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे गोदावरी नदीतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते.

गोदावरी नदीवर खालील भागात जायकवाडी धरण आहे. त्याची एकूण क्षमता तब्बल १०२ टीएमसी आहे. यात जिवंत जलसाठा ७६ टीएमसी तर, उर्वरित मृतसाठा म्हणून गणला जातो. जायकवाडीच्या क्षमतेचा विचार केल्यास ते जवळपास पूर्ण भरेल इतके पूरपाणी एकट्या नाशिकमधून तिकडे प्रवाहित झाल्याचे दिसून येते.

पाऊस निरोप घेण्याच्या मार्गावर असताना हंगामाच्या शेवटच्या आठवड्यात सहसा इतका विसर्ग करावा लागत नाही. परंतु, अतिवृष्टीने यंदा तशीच वेळ आली. रविवारी रात्री नांदूरमध्यमेश्वरमधून ८७ हजार ५४९ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. पावसाने उघडीप घेतल्यानंतर तो कमी झाला. हंगामाच्या अखेरीस इतके पाणी सोडावे लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी म्हटले आहे.

या हंगामात एकूण ९३ टीएमसी इतके पूरपाणी प्रवाहीत झाले असले तरी हा विक्रम ठरलेला नाही. कारण, १९६९ मधील महापूरात नाशिकमधून आजवरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल १८५ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले होते. २००६ मध्ये १८१ टीएमसी पूरपाणी गेल्याच्या नोंदी आहेत. याचा विचार केल्यास त्या तुलनेत चालू हंगामातील विसर्ग मात्र कमी असल्याचा दाखला निर्मळ यांनी दिला. २००६ मध्ये जायकवाडीतून दोन लाख ५६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडावे लागले होते. जायकवाडीने यंदा विसर्गाचे मागील सर्व विक्रम मोडले, मात्र नाशिकमधील धरणांच्या विसर्गाचा विक्रम प्रचंड पाऊस होऊनही अभेद्य राहिला.