नाशिक : २०२६-२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध कामांना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी कुंभमेळा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन लक्ष ठेवून आहेत. त्यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कुंभमेळा कामांविषयी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. भूसंपादनासह विविध विकास कामांना गती द्यावी, सर्व कामांचे नियोजन करुन ती कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश महाजन यांनी दिले आहेत.
याआधी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०१५-१६ मध्ये आयोजित कुंभमेळ्यावेळीही गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री होते. त्यामुळे त्यावेळी असलेल्या कामाचा अनुभव महाजन यांना २०२६-२७ मध्ये आयोजित कुंभमेळ्याच्या कामांसाठी उपयोगी येणार आहे. गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री असल्याने तेच सर्व जबाबदारी पाहत आहेत. त्यामुळे महायुतीतील इतर घटकपक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे मात्र अस्वस्थ आहेत. कुंभमेळ्यासंदर्भातील बैठकांना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना आमंत्रित केले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट कुंभमेळ्याच्या नियोजन बैठकांपासून सध्या तरी दूरच असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, बाबासाहेब पारधे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी, आगामी कुंभमेळा विकास कामासंदर्भात कोणताही विलंब नको. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. विकास कामे नियोजनबद्ध व दर्जेदार होतील याकडे यंत्रणांनी लक्ष द्यावे, कामे पूर्ण करताना त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. त्यातही रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कुंभमेळ्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी उपक्रम राबवावेत, असे सांगितले.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी, कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संनियंत्रण करावे. तसेच त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. या बैठकीत रिंग रोड भूसंपादन, त्र्यंबकेश्वर – गोदावरी पाणीपुरवठा योजना, घाटांचे बांधकाम, साधुग्राम भूसंपादन, रस्ते बांधकाम, रेल्वे स्थानक, ओझर विमानतळ विकास कामे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, करिश्मा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांनी आपापल्या विभागांतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.