नाशिक – आगामी कुंभमेळ्यावर आपला प्रभाव राखण्यासाठी महायुतीत अंतर्गत स्पर्धा सुरू असताना या नियोजनाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशासकीय वर्तुळात सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली केली गेली असून त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. तर शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एनएमआरडीए) आयुक्त म्हणून बदली झाली. या व्यतिरिक्त पिंप्री-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदु धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला दीड वर्षांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय पातळीवर व्यापक नियोजन, हजारो कोटींच्या कामांना चालना दिली जात आहे. या कामात सहभागी प्रमुख अधिकाऱ्यांना कुंभमेळा होईपर्यंत सहसा बदलले जात नाही. अपवादात्मक स्थितीत बदली केली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. जलज शर्मा हे २२ जुलै २०२३ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना आणि कुंभमेळ्याची कामे सुरू होण्याच्या मार्गावर असताना त्यांची बदली केली गेली. महत्वाची बाब म्हणजे नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

महायुतीतील सुप्त संघर्षाने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी मिळताच महाजन यांनी प्रशासकीय यंत्रणेवर पकड मजबूत करीत जणू पालकमंत्री असल्याच्या थाटात कारभार सुरू केल्याची मित्र पक्षांची भावना आहे. या स्थितीत आपल्या खास मर्जीतील अधिकाऱ्याला नाशिक जिल्हाधिकारीपदी आणून त्यांनी केवळ कुंभमेळाच नव्हे तर, जिल्हा नियोजन समितीवर आपले वर्चस्व ठेवण्याची पुरेपूर तयारी केल्याचे दिसत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणच्या आयुक्तपदी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पुर्वी ही जबाबदारी नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभाराच्या स्वरुपात होती. कुंभमेळा तयारीला वेग देण्यासाठी पूर्णवेळ आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एनएमआरडीए) आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नाशिकमधील महत्वाच्या प्रशासकीय फेरबदलात भाजप व कुंभमेळामंत्री महाजन यांचा प्रभाव दिसत असून या नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना विश्वासात घेतले की नाही, ते मात्र गुलदस्त्यात आहे.