नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाकरिता स्थापन झालेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी मनुष्यबळ जमविण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून अधिकारी-कर्मचारी सामावून घेण्याची तयारी करण्यात येत आहे.
गोदाकाठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सरकारने प्रयागराजच्या धर्तीवर कायमस्वरुपी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले आहे. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षेखाली प्राधिकरणात विविध शासकीय विभागातील एकूण २२ जणांचा समावेश राहणार आहे. यासाठी कुंभमेळा आयुक्त हे नवीन पद तयार करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या पदावर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली.
२०२७ मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन आणि नियोजनासाठी प्राधिकरण कार्यालयात नायब तहसीलदार ते अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) दर्जाचे आणि महसूल विभाग वगळून इतर विभागातील या पदांच्या समकक्ष, शाखा अभियंता ते कार्यकारी अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी), लघु टंकलेखक, लघुलेखक, लिपिक, वरिष्ठ लिपिक अथवा समकक्ष, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, उपलेखापाल किंवा समकक्ष आदी पदे प्रतिनियुक्तीद्वारे तसेच अन्य मार्गांनी भरण्यात येणार आहेत.
या संदर्भात कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगरच्या सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यालयांना पत्र दिले आहे. कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात कामाची सचोटी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयीन प्रमुखांमार्फत विभागीय आयुक्तांच्या मेलवर अर्ज पाठविण्यास सांगण्यात आले आहे. अर्जाबरोबर वैयक्तिक माहिती इच्छुकांना थोडक्यात द्यावी लागणार आहे.