नाशिक – प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाणी पुरवठा योजना, रस्ते आदी कामांची निविदा प्रक्रिया राबवून दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. संपूर्ण भारतात कुठेही होत नाही, तितक्या जलदगतीने काम नाशिकमध्ये करण्यात आले. या प्रक्रियेसाठी कुठेही साधारणत चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. वाटाघाटीद्वारे वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशे ते पावणे दोनशे कोटींची बचत करण्यात आल्याचा दावा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केला आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या सुमारे सहा हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिकेचे रस्ते, पूल, जलशुध्दीकरण प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रामकाल पथ, ऑप्टीकल फायबर आणि सीसी टीव्ही प्रकल्प आदींचा समावेश आहे.

कुंभमेळ्याची छोटी, छोटी कामे एकत्रित करून बड्या ठेकेदारांना दिली गेली, यातून स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ठेकेदार संघटनांसोबत शिवसेनेकडून (शिंदे गट) अनेकदा केला गेला. शिवाय, कुंभमेळ्यांच्या कामांना विलंब झाल्याची ओरड होत आहे. हे आक्षेप मनपा आयुक्त खत्री यांनी अप्रत्यक्षपणे खोडून काढले.

सिंहस्थ कामांना विलंब झालेला नाही. अतिशय वेगाने, पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. अनेक प्रकल्पांचे कार्यारंभ आदेश दिले गेले. ९०० ते एक हजार कोटी खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील १८ रस्ते कामांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. महापालिकेचे सर्व प्रकल्प जानेवारी २०२७ मध्ये पूर्णत्वास जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्याची सर्व कामे दर्जेदार होतील. निविदा प्रक्रियेत स्थानिकांना समान संधी दिली गेली. महाराष्ट्रातील मक्तेदार सहभागी झाले. काही प्रकल्पांत मोठ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला. चांगली स्पर्धा होऊन मक्तेदार अंतिम करण्यात आले. अंदाजित खर्चाच्या तुलनेत वाटाघाटीद्वारे कमी दरात कामे देण्यात आली. रस्त्यांची कामे अंदाजित खर्चाच्या १५ ते २० टक्के कमी दराने देण्यात आली.

जल शुध्दीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ऑप्टीकल फायबर, सीसी टीव्ही यंत्रणा आदी सर्व कामे सहा ते आठ टक्के कमी दराने देण्यात आली. केवळ रस्ते कामात सरासरी १६ टक्के कमी दर पकडले तरी १५० ते १६० कोटींची बचत झाल्याकडे आयुक्त खत्री यांनी लक्ष वेधले.

इतर कामांमध्ये वाटाघाटीद्वारे मोठी बचत झाल्याचा दावा त्यांनी केला. वाचलेल्या निधीचा विनियोग नाशिककरांसाठी केला जाईल. पुढील वर्षी महापालिकेत लोकप्रतिनिधी येतील. त्याच्या मागणीनुसार नियोजन करण्यात निधीचा उपयोग होऊ शकेल. कुंभमेळ्याच्या कामांना विलंब झाल्याची धारणा पसरली असली तरी वास्तव तसे नाही. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी उपरोक्त प्रक्रिया आधी पूर्णत्वास गेल्या आहेत. सर्व कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर त्यांच्या चाचण्या व तत्सम प्रक्रिया पार पडतील, असे आयुक्त खत्री यांनी सूचित केले.