नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेच्या मूळ घटनेत विश्वस्त मंडळाच्या वर्षातून किमान दोन सभा होतील, असे म्हटले आहे. म्हणजे वर्षभरात कमीतकमी दोन सभा होणे अभिप्रेत आहे. अधिकतम किती सभा घ्याव्यात, यावर कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु, ज्या विश्वस्त मंडळाला घटनेने सर्वाधिकार दिले आहेत, त्यांच्या सभाही मर्यादित ठेवण्याकडे काही सल्लागारांचा प्रयत्न राहिला. कुठलाही अधिकार नसताना विश्वस्त मंडळाच्या सभांवरच सल्लागारांकडून अंकुश ठेवण्याचा प्रकार प्रतिष्ठानचा कारभार एकचालकानुवर्ती झाल्याची साक्ष देत असल्याकडे लक्ष वेधले जाते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी मात्र संस्थेच्या कारभारात कुणाचाही प्रभाव नसल्याचा दावा केला आहे.
कार्यवाह सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे प्रतिष्ठानचा कारभार चर्चेत आला आहे. मूळ घटनेत सल्लागार पदाचा कुठेही उल्लेख नाही. असे असताना सध्या विलास लोणारी, हेमंत टकले, लोकेश शेवडे आणि मकरंद हिंगणे असे चार माजी पदाधिकारी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. संबंधितांची नियुक्ती घटनेत दुरुस्ती करून झाली की, घटना बाजुला ठेवून, याबद्दल सभासदांमध्ये साशंकता आहे. प्रतिष्ठानमध्ये विश्वस्त मंडळाच्या बैठकांवर सल्लागारांचा प्रभाव आहे. त्यामुळेच संस्थेचा कारभार विश्वस्त मंडळ कमी आणि सल्लागार अधिक चालवत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु आहे.
संस्थेच्या मूळ घटनेत विश्वस्त मंडळाचे आकारमान, नवीन विश्वस्तांची निवड, अधिकतम १० वर्षाची कालमर्यादा, बँक खाती चालविण्याचा अधिकार आदींचा सुस्पष्ट उल्लेख आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाच्या वर्षातून किमान दोन सभा होतील. या सभेसाठी पाच सदस्य गणपूर्तीसाठी आवश्यक असतील. सभेत सर्व निर्णय बहुमताने घेतले जातील. एखाद्या विषयावर समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्यााचा अधिकार त्या सभेच्या अध्यक्षास असेल, असे नमूद आहे.
प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांची चर्चा करण्यासाठी मध्यंतरी विश्वस्त मंडळाच्या वर्षभरात किमान सहा सभा घेण्याचा मुद्दा मांडला गेला होता. तेव्हा एका सल्लागाराने त्यास हरकत घेतली. वर्षभरात दोनपेक्षा अधिक बैठका घेण्याची गरज नसल्याचे बजावले. तशी परंपरा नाही. आणि संस्थेच्या घटनेचीही तशी अपेक्षा नसल्याचा दाखला संबंधित सल्लागारांकडून दिला गेल्याचे सांगितले जाते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील प्रत्येक निर्णय सल्लागारांच्या इच्छेवर होतात. सर्वाधिकार असणाऱ्या विश्वस्त मंडळाची घटनेत तरतूद नसलेल्या सल्लागारांनी कोंडी केल्याचे चित्र निर्माण होणे प्रतिष्ठानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
संस्थेच्या कारभारात कुणाचा प्रभाव आहे, असे आपल्या निरीक्षणात आलेले नाही. आजवर अनेकदा सभा झाल्या. वार्षिक सर्वसाधारण सभाही झाली. पुरस्काराशी संबंधित बैठक झाली. आपण आजवर अनेकदा संस्थेत गेलो. विश्वस्त मंडळाच्या सभा आणि बैठकीत देखील कुणाचा प्रभाव असल्याचे काही आढळले नाही. – वसंत आबाजी डहाके (अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान)
