करोना चाचणी जलदगतीने होण्याकरिता स्थानिक पातळीवर अल्पावधीत उभारण्यात आलेली प्रयोगशाळा अखेरीस मंगळवारी कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेत केलेली पहिली चाचणी नकारात्मक आली. दिवसाला १८० नमुने तपासणीची प्रयोगशाळेची क्षमता आहे. चाचणी अहवाल मिळण्यास पूर्वी तीन ते चार दिवसांचा लागणारा अवधी प्रयोगशाळेमुळे टळणार आहे. करोना विरोधातील लढाईला वेग मिळणार आहे.
जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत १८१ रुग्ण आढळले आहेत. यातील नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात ११, ग्रामीण भागातील ११ आणि मालेगावमधील १५९ जणांचा समावेश आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण केले जाते. यामध्ये लक्षणे आढळणाऱ्यांची चाचणी महत्वाची असते. हे नमुने तपासणीसाठी पुणे आणि धुळे येथे पाठविले जात होते. त्याचे अहवाल तीन-चार दिवसानंतर प्राप्त होत असल्याने संपर्कातील व्यक्तींचा शोध, विलगीकरण यास विलंब होत असे. स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयोगशाळेसाठी आग्रही होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधितांशी चर्चा करून प्रस्ताव शासनाला सादर केला. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने प्रयोगशाळेसाठी आवश्यक ती जागा, मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शविली. या सर्वाच्या प्रयत्नांची फलश्रृती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने प्रयोगशाळेला मान्यता देण्यात झाली. दातार जेनेटिकने अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध केली. तीन हजार तपासणी संच उपलब्ध करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. याचवेळी नियमांमध्ये बदल झाल्यामुळे प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ची मान्यता मिळविणे अनिवार्य करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रयोगशाळा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला.
अवघ्या चार तासात ९० नमुन्यांची होणार तपासणी
प्रयोगशाळेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी पहिल्या नमुन्याची चाचणी करण्यात आली. ती नकारात्मक आली. प्रयोगशाळेत दररोज १८० नमुन्यांची तपासणी करता येईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. एकाचवेळी ९० नमुन्यांची तपासणी अवघ्या चार तासात करता येते. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाचे साधन उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय, वैद्यकीय वर्तुळातून उमटत आहे.