नाशिक – शुक्रवारी बिबट्याने नाशिक शहरातील महात्मानगर परिसरातील संत कबीरनगर आणि कामगारनगरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर वन विभागाने अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्यास ताब्यात घेतले. ही कामगिरी करताना वन विभागाचे दोन कर्मचारीही जखमी झाले.

परंतु, वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या कामगिरीपेक्षा घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असताना त्या ठिकाणी दाखल झालेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचाच गवगवा अधिक झाला. मंत्री गिरीश महाजन यांचे आकस्मिकपणे त्या ठिकाणी येणे, हीच वन कर्मचारी आणि पोलिसांसाठी खरेतर आपत्ती ठरल्याची चर्चा रंगली.

धाडसी स्वभाव गुण असलेले गिरीश महाजन यांनी आपल्या या स्वभावगुणाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला याआधीही अनेकवेळा करुन दिली आहे. स्वत: उत्कृष्ट खेळाडू असलेले गिरीश महाजन हे कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदतकार्यात आघाडीवर असतात. काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीवेळी नागरिकांच्या बचावासाठी बोटीतून स्वत: जाणारे महाजन तेव्हां गाजले होते, ते त्यावेळी हसत हसत त्यांनी केलेल्या फोटोसेशनमुळे.

अशाच एका प्रसंगात शेतात लपलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांबरोबर ते बंदूक घेऊन शेतात शिरले होते. अशा आपत्तीप्रसंगी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पुढे सरसावणाऱ्या गिरीश महाजन यांच्या या स्वभावामुळे शुक्रवारी नाशिकमध्ये मात्र वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारीच अडचणीत आले होते.

संत कबीरनगरात बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाला. महाजन हे थेट वन अधिकारी, वनरक्षकांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या जाळीजवळ जाऊन थांबले. त्याठिकाणी ते कर्मचार्‍यांना सूचना देऊ लागले.

बिथरलेला बिबट्या काय करेल, याची शाश्वती नसल्याने आणि मंत्री महाजन हे थेट जाळीजवळ येऊन थांबल्याने अधिकार्‍यांपुढे बिबट्यापेक्षाही वेगळीच समस्या निर्माण झाली. मंत्री गिरीश महाजन यांना सांगूनही ते हटेनात. याची माहिती पोलीस आयुक्तालयात मिळाल्यावर परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना त्या ठिकाणी उपस्थित होण्याची सूचना देण्यात आली.

आधीच त्याठिकाणी जमा झालेली बघ्यांची गर्दी, त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर आलेले पक्षाचे कार्यकर्ते, त्यात नव्याने दाखल झालेले पोलीस अधिकारी, अशी वेगळीच धावपळ उडाली होती. बिबट्यापेक्षा यंत्रणेवर मंत्री गिरीश महाजन यांच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली होती.

मंत्री गिरीश महाजन यांनी वनरक्षकांना त्यांचे काम करु देणे आवश्यक होते. स्वत: या ठिकाणी येण्याची काय आवश्यकता होती, उलट महाजन यांना काही होू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी पोलिसांवर आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. परंतु, मंत्री महाजन मात्र त्या ठिकाणी जमलेल्या माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आणि आपला स्वभाव कसा धाडसी आहे, हे सांगण्यात रंगून गेले होते.