नाशिक : अंबड परिसरातील सोन्याच्या दुकानात भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवित लूट करणाऱ्या संशयितांपैकी एकाला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकला यश आले. त्याच्याकडून पाच लाख ४० हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंबड येथील श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात १७ फेब्रुवारी रोजी भरदुपारी दरोडा पडला. तीन जणांनी दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवत दागिने घेऊन फरार झाले. याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा एक आणि दोनच्या वतीने या गुन्ह्याचा तपास सुरू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून शोध घेण्यास सुरूवात केली. काळ्या रंगाच्या विनाक्रमांक असलेल्या मोटारसायकलवर बसून एक जण सोने विक्रीसाठी सिन्नर फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी कारवाईचे आदेश दिले. सिन्नरफाटा येथे सापळा रचण्यात आला. नीलेश उर्फ शुभम बेलदार (२५, रा. चुंचाळे) याला पकडून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि ४४.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८७.८७० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा पाच लाख ४० हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.