नाशिक – महायुतीतील तीनही पक्षांत नाशिक लोकसभेच्या जागेवरून दोन आठवड्यांपासून चाललेला संघर्ष कुठलाही तोडगा निघाला नसताना अकस्मात शांत झाला आहे. शिवसेनेचा (शिंदे गट) धीर सुटत असताना या जागेसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपचा आवाज छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यानंतर बदलला आहे. भुजबळांना सकल मराठा समाजापाठोपाठ ब्राम्हण महासंघाकडून विरोध होत आहे. दुसरीकडे, भुजबळ समर्थकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तूर्तास सर्वांनी मौन बाळगले आहे.

महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याने पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. लवकर उमेदवारी जाहीर करावी, यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही काहीच घडले नाही. याच काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिल्लीतून भाजप नेत्यांनी आपले नाव निश्चित केल्याची माहिती दिली होती. तत्पूर्वी गोडसे यांच्या विरोधात भूमिका घेऊन भाजपने ही जागा कुठल्याही स्थितीत स्वत:कडे घेण्याची तयारी केली होती. भाजप कार्यालयात नेत्यांसमोर आंदोलन झाले. शिंदे गटाला विरोध करणाऱ्या भाजपने भुजबळ पर्यायाने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जागा जाण्याचा विषय आल्यावर नरमाई स्वीकारली. शिंदे गटाविरोधाप्रमाणे राष्ट्रवादीविरोधात त्यांनी रोखठोक भूमिका घेतली नाही. भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू होताच सकल मराठा समाजाने त्यांच्या विरोधात फलक लावले होते. ब्राम्हण महासंघाने भुजबळांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. नाशिक पुरोहित संघाने गोडसेंचे समर्थन करत अप्रत्यक्षपणे भुजबळांविषयी नाराजी व्यक्त केली. महायुतीत नाशिकच्या जागेवरून परस्परांवर बरीच आगपाखड झाली आहे. त्याचा लाभ विरोधकांनी घेतल्याने वातावरण निवळण्यासाठी सध्या सर्वांनी मौन धारण केले आहे.

हेही वाचा – विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ समर्थक कामाला

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांचे नाव पुढे केल्याने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी शांत झाले आहेत. भुजबळ यांच्याविषयी स्थानिक पातळीवर तयार झालेल्या वातावरणाची कल्पना त्यांनी वरिष्ठांना दिली आहे. शिंदे गटात गोडसेंऐवजी अन्य नावाची चाचपणी केली जात आहे. उमेदवारी न मिळाल्यास गोडसे हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता समर्थक व्यक्त करतात. भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारी मिळणार, हे गृहीत धरून तयारीला लागले आहेत. भुजबळांचे स्वागत, प्रचार कार्यालय आदी नियोजन केले जात आहे.