नाशिक – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने शनिवारी ४० विद्यार्थ्यांच्या समूहासह ‘शिवरायांची शौर्य गाथा’ पोवाड्यातून संगीतमय स्वरुपात मांडली जाणार आहे. या कार्यक्रमात नाशिकमधील ज्येष्ठ शिवचरित्र लेखक तथा व्याख्याते सोपान वाटपाडे आणि डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मसापच्या नाशिकरोड शाखेने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनापासून ४०० व्या शिवजन्मोत्सवापर्यंत “शिवयुगाची स्मरणगाथा” कार्यक्रम मालिका सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी वेगळी संकल्पना राबवली जाते. मालिकेचे हे द्वितीय वर्ष असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे ही संकल्पना आहे. मराठा हायस्कूलचे संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांचे ४० विद्यार्थी ‘शिवरायांची शौर्य गाथा’ पोवाड्यातून सादर करणार आहेत.
विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेताना त्यांच्याकडून पोवाडा स्वरुपात शिवरायांची शौर्यगाथा मांडण्याचे काम करुन घेण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण राहणारआहे. शनिवारी सकाळी १० वाजता नाशिकरोड येथील ऋतुरंग ॲम्पिथिएटर येथे मसाप जिल्हा प्रतिनिधी तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
सरदार त्र्यंबकराव मामा पेठे यांनी लढवय्या छत्रपती ताराराणींचे सरदार म्हणून मराठा साम्राज्याचे सेवाकार्य केले. १७०० ते १८१८ या कालावधीत त्यांच्या घराण्याने सेवाकार्य बजावले. सदाशिवराव पेशव्यांचे मामा असलेल्या सरदार त्र्यंबकराव पेठेंनी दक्षिणेतील मोती तलावाच्या लढाईत हैदर अली आणि टिपू सुलतान यांना रणांगणातून पळवून लावले, असा इतिहास आहे. या कार्यक्रमात त्यांचे नववे वंशज सरदार डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नाशिकमधील ज्येष्ठ शिवचरित्र लेखक सोपान वाटपाडे यांची पुस्तके प्रकाशित आहेत. ते उत्तम व्याख्याते असून यांनी शिवचरित्र, शंभूचरित्र, जिजाऊ चरित्रांवर राज्यभरात व्याख्याने दिली आहेत. त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या पोवाड्याचा आणि शिवशौर्य गाथेचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त शिवभक्त आणि साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष ॲड. सुदाम सातभाई, दिनेश पैठणकर, रेखा पाटील, सुरेखा गणोरे, मानसी घमंडी, रामचंद्र शिंदे, विलास गोडसे, प्रशांत कापसे, योगेश कापडणीस आदींनी केले आहे.