मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात क्रुरता व राक्षसी प्रवृतीची परिसीमा गाठणारी अत्यंत संतापजनक अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका नराधम तरुणाने साडे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने डोंगराळे पंचक्रोशी हादरुन गेली असून मालेगाव-कुसुंबा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परिसरातील महिला, पुरुषांनी निषेध व्यक्त केला. तसेच गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

रविवारी दुपार नंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली चिमुकली बराच वेळ झाला तरी,घरी न परतल्याने पालक व नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. दोन-अडीच तास झाल्यावरही तिचा शोध न लागल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा शोध घेणार्‍या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवरजवळ तिचा मृतदेह आढळून आला. छिन्नविछिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावर चिमुकलीची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच गावकऱ्यांच्या लक्षात आले.

काही काळापासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या झाल्याची वार्ता समजल्यावर संपूर्ण गावात त्याचे तीव्र पडसाद उमटले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबिर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक दामोदर काळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकरी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मालेगावऐवजी नाशिक येथे फॉरेन्सिक लॅबमध्ये शवचिकित्सा करण्यात यावी, आरोपीला त्वरित अटक करून फाशी द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवले. त्यानुसार डोंगराळे गावातील विजय संजय खैरनार (२४) यास ताब्यात घेण्यात आले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी डोंगराळे येथे संतप्त गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी,असा आग्रह गावकऱ्यांनी धरला.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळे येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. आरोपीला तातडीने फाशी द्यावी, असा आग्रह त्यांच्याकडे देखील गावकऱ्यांनी धरला. संवेदनशील प्रकरण लक्षात घेता सामान्य रुग्णालय प्रशासनाने या चिमुकलीचा मृतदेह रात्रीच नाशिक येथे विच्छेदनासाठी पाठवून दिला.

नाशिक येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले गेले आहे. संशयीत नराधम व मृत चिमुकलीचे पालक यांची घरे शेजारी-शेजारी आहेत. चॉकलेटचा बहाना करून त्याने या चिमुकलीला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलीसांचा संशय आहे.

संशयीत हा वृध्द आजीसोबत गावी वास्तव्यास आहे. रविवारी आजी बाहेरगावी गेल्याने घरी एकटाच असताना त्याने हे दुष्कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. ज्या मोबाइल टॉवरच्या ठिकाणी चिमुकलीचा मृतदेह आढळून आला, ते ठिकाण संशयीताच्या घराला लागूनच ‌आहे.

कुणीच वकील पत्र घेतले नाही..

डोंगराळ येथील चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाचा मालेगाव वकील संघाने निषेध केला आहे. सदर घटना अत्यंत क्रूर असल्याने संघाच्या कोणत्याही सभासदाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी विनंती संघाचे अध्यक्ष ॲड. सुधाकर निकम यांनी केली होती. सोमवारी संबंधित आरोपीला पोलीसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याचे वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही.