नाशिक : शहरात खासगी सावकारांच्या जाचाची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून शिखरेवाडीत एका खासगी सावकार महिलेने मुलगा आणि एका साथीदाराच्या मदतीने महिलेला अमानुषपणे मारहाण करत, विनयभंग करत पाच लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल ३८ लाख ४५ हजार रुपयांची वसुली केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पीडित महिला आणि संशयित खासगी सावकार सारिका किर (४५) यांच्यात १० वर्षांपासून ओळख होती. २०१८ मध्ये पीडितेला आर्थिक अडचण आली असता तिने सारिकाकडून पाच लाख रुपये मासिक पाच टक्के व्याजाने घेतले. पीडिता दरमहा २५ हजार रुपये व्याज देत होती. पीडितेकडून व्याज देण्यास विलंब झाला की तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात येत असे. तिच्या मुलांनाही मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. डिसेंबर २०२२ पासून सारिकाने व्याजदर वाढवून १० टक्के केला. दरमहा ५० हजार रुपये घेण्यास सुरुवात केली. मुलांच्या नोकरीतील पैसे, स्वतःच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न असे सर्वकाही सारिकाला देण्यात येऊ लागल्याने पीडितेच्या घरात अडचण भासू लागली. डिसेंबर २०२३ मध्ये काही महिन्यांचे व्याज थकल्यानंतर सारिकाने पीडितेला घरी बोलावून पुन्हा धमकावले.

मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने पाच तोळ्यांचे दागिने एका ओळखीच्या महिलेमार्फत गहाण ठेवले. सारिकाला दीड लाख रुपये दिले. दरम्यान, पीडितेचे पैसे थकल्यावर सारिका आणि तिचा मुलगा अमन यांनी पीडितेला लाकडी दांड्याने मारहाण केली. अमनने विनयभंग केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने घर बदलले. परंतु, सारिका सतत फोनवर धमक्या देत राहिली. दोन जून रोजी पीडितेने सारिकेच्या मुलाच्या खात्यावर १० हजार रुपये पाठवले असतानाही सारिकाने व्याज दिले नाही म्हणून पीडितेच्या घरातील वॉशिंग मशीन, दुचाकी, सोन्याचा गणपती, सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने नेल्या. त्याआधी पीडितेने घर गहाण ठेवून दोन लाख आणि पतीच्या भविष्यनिर्वाह निधीतील साडेतीन लाख रुपये दिल्यानंतरही सारिकाकडून देण्यात येणारा त्रास थांबला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ जुलै रोजी सारिका, तिचा मुलगा अमन आणि खान नावाची व्यक्ती पीडितेच्या घरी गेले. मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. विनयभंग करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर पीडितेच्या मुलाने पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघे संशयित घरात उपस्थित होते. पोलिसांशीही ते उद्धटपणे वागले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकार मायलेकासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर परिसरात वैभव देवरे, कुंदन पिता-पुत्र, सातपूर परिसरातील काही खासगी सावकार यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. त्यांच्या विळख्यातून काहींना सुटता आले. काहींनी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले.