नाशिक – शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा राडारोडा टाकणे, बांधकाम प्रकल्पांवर हरित जाळीचा वापर न करणे, पाणी साचवून डासांच्या उत्पत्तीला प्रोत्साहन देणे अशी विविध कृत्य करणाऱ्यांवर लवकरच भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी व जवान कारवाई करताना दिसणार आहेत.

महापालिका उपद्रव शोध पथक कार्यान्वित करीत आहे. त्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी ते सुभेदार, नायब सुभेदार, शिपाई, नायक, हवालदार आदींना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका कंत्राटी पद्धतीने माजी सैनिकांना मानधनावर नियुक्त करणार आहे.

उपद्रव शोध पथकाच्या पथक प्रमुख पदासाठी लष्करात मानद लेफ्टनंट, मानद कॅप्टन किंवा सुभेदार मेजर किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष निवृत्त अशी अर्हता आहे. या पदासाठी दरमहा ४५ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. विभागीय पथक प्रमुख पदासाठी दरमहा ४० हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सैन्यात सुभेदार, नायब सुभेदार पदावरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्तांना संधी दिली जाणार आहे.

उपद्रव शोध पथकात सुरक्षा सहायक म्हणून सैन्य दलात शिपाई, नायक, हवालदार या पदांवरून निवृत्त किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्त जवान अर्ज करू शकतात. या पदासाठी दरमहा ३५ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल.

एकूण ७३ पदे

उपद्रव शोध पथकात पथक प्रमुख म्हणून एक, विभागीय पथक प्रमुख म्हणून १२ आणि सुरक्षा सहायकाची ६० अशी एकूण ७३ पदांवर माजी लष्करी अधिकारी व जवानांची भरती करण्यात येणार आहे. दरमहा निश्चित केलेल्या मानधनाव्यतिरिक्त कोणतेही भत्ते किंवा टीए, डीए अथवा अन्य प्रदान केले जाणार नाही. पथक प्रमुखासाठी वयोमर्यादा ५८ वर्ष, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहायक पदासाठी ५० वर्ष पूर्ण केलेली असावी. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून सादर करावा लागेल.

उमेदवाराने सैन्य दलात किमान १५ वर्ष सेवा सेवा केलेली असणे बंधनकारक आहे. नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून इमेलवर पाठविता येईल. पात्र ठरलेल्या उमेदवाराची मुलाखत प्रक्रियेतून समिती निवड करणार आहे. केवळ निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, असे महापालिकेने म्हटले आहे.