नाशिक : महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचनेत आपल्या सोईनुसार बदल केल्याचा आरोप मनसेसह विरोधकांनी केला होता. परंतु, ही प्रभागरचना २०१७ मधील रचनेनुसार ठेवण्यात आली आहे. मागील निवडणुकीत भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळाली होती. प्रभाग रचनेत बदल न होण्यामागे हे देखील कारण असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.

महानगरपालिकेत ३१ प्रभागात एकूण १२२ सदस्य असतील. यातील २९ प्रभाग चार सदस्यीय तर, १५ व १९ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत. आधीच्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग, सदस्य संख्या कायम आहे. प्रभागांच्या भौगोलिक सिमांसह अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. महापालिकेची मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. करोना, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ठ विषय यामुळे प्रभाग रचनेत अनेकदा बदल झाले. राज्यातील सत्तांतरानंतर आधीचा निर्णय रद्द करून चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झाला. परंतु, निवडणुकीला मुहूर्त लागला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

मागील निवडणुकीत भाजपला ६६, एकसंघ शिवसेना ३५, काँग्रेस सहा, एकसंघ राष्ट्रवादी सहा, मनसे पाच, अपक्ष तीन, रिपाइं आठवले गट एक असे बलाबल होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलली. गतवेळी एकसंघ शिवसेना-भाजप परस्परांविरोधात मैदानात उतरले होते. यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यात व केंद्रातील सत्तेत भागिदार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र परस्परांविरोधात उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

मागील प्रभाग रचना भाजपला फायदेशीर ठरली होती. यावेळी त्यात फारसे बदल झाले नसल्याने ती पुन्हा भाजपला पूरक ठरू शकते. यंदाही भाजपने स्वबळावर निवडणुकीची तयारी चालवली आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर बरेचसे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले. अलीकडेच काहींना भाजपने स्वताकडे खेचले. भाजप शिंदे गटाशी स्थानिक पातळीवर युती करण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे भाजपला शह देण्यासाठी शिंदे गट अजित पवार गटाशी हातमिळवणीच्या प्रयत्नात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांसह विरोधकांना अनेक जागांवर पराभवाची धुळ चारली होती. दुसरीकडे मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढेल की नाही, याची स्पष्टता झालेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीचे भवितव्य निश्चित झालेले नाही. प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रक्रियेवर मध्यंतरी मनसेने आक्षेप घेतला होता. आता २०१७ ची प्रभाग रचना कायम राहिल्याने मनसेची भूमिका काय असेल हे गुलदस्त्यात आहे. प्रभाग रचनेविषयी माहिती घेऊन, अभ्यास करून भाष्य केले जाईल, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळी प्रारूप प्रभाग रचनेचा अभ्यास करीत असून ती कशी लाभदायक ठरेल, याची समीकरणे मांडली जात आहे.