नाशिक – महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक प्रस्थापितांचे प्रभाग सुरक्षित राहिले. तर काही माजी नगरसेवकांना आरक्षणामुळे फटका बसला. काहींवर घरातील महिलांना संधी देण्याची वेळ आली. काही प्रभागात फार मोठे फेरबदल न झाल्यामुळे माजी नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. इच्छुकांनी आरक्षणाचा कसा लाभ घेता येईल, याची समीकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत मंगळवारी महाकवी कालिदास कला मंदिरात मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत पार पडली. ३१ प्रभागांतील वेगवेगळ्या प्रवर्गाची आरक्षण निश्चिती शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने करण्यात आली. पुन्हा महापालिकेत जाण्याची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काहींना आरक्षण सोडतीतून धक्के बसले. अनेक दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित राहिले.
सिडको विभागात सहा प्रभागांपैकी क्रमांक २४, २५, २८ आणि २९ या चारही प्रभागात महिलांना निवडणूक लढविण्याची अधिक संधी मिळाली. सिडकोत बहुतांश प्रभागात पूर्वीचेच आरक्षण राहिले. काही ठिकाणी एकाच पक्षातील अधिक इच्छुक असल्याने बंडखोरीला उधाण येण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी महायुती न झाल्यास भाजप, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समोरासमोर उभे ठाकू शकतात. प्रभाग २७ अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने माजी नगरसेवक राकेश दोंदे यांना निवडणूक लढवता येणार नाही.
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये दिनकर पाटील, हेमलता कांडेकर, मनसेचे सलीम शेख, शिवसेनेच्या सीमा निगळ, विलास शिंदे आणि नयना गांगुर्डे या माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला. संतोष गायकवाड, रवींद्र धिवरे, योगेश शेवरे, दीक्षा लोंढे या माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला. संबंधितांना एकतर दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविणे किंवा घरातील वा नाते संबंधातील कुणाला संधी देण्याच्या पर्यायावर विचार करावा लागणार आहे.
प्रभाग २६ मध्ये सर्व माजी नगरसेवकांना संधी आहे. नाशिकरोड विभागात प्रभाग २१, १९ आणि २२ मध्येही अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले. प्रभाग १९ मध्ये माजी नगरसेवक संतोष साळवे आणि प्रभाग २२ मधून जगदीश पवार यांचा पत्ता कट झाला. उर्वरित प्रभाग १७, १८, २० व २१ यात कुठलेही मोठे बदल न झाल्यामुळे माजी नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आरक्षण सोडतीत पंचवटी विभागात माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, भिकुबाई बागूल यांच्यासह खून व गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे तसेच माजी गटनेता जगदीश पाटील यांचे प्रभाग सुरक्षित राहिले. भाजपचे माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, सुरेश खेताडे यांच्या प्रभागात अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने त्यांची संधी हुकली.
माजी महापौर रंजना भानसी यांचा प्रभाग अनुसूचित जमाती पुरुषांसाठी झाला आहे. स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते यांना एकतर सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागेल अथवा कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागेल. अरुण पवार, मच्छिंद्र सानप, पूनम मोगरे, प्रियांका माने, रुची कुंभारकर, पूनम धनगर, पूनम सोनवणे, सरिता सोनवणे, हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, नंदिनी बोडके, सुनिता पिंगळे या माजी नगरसेवकांना संधी मिळणार आहे.
३१ प्रभागात एकूण १२२ सदस्य आहेत. यात खुल्या गटासाठी ६३, ओबीसी संवर्गासाठी ३२, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ आणि नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. एकूण जागांपैकी निम्म्या ६१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. विविध प्रर्गातील महिलांसाठी राखीव जागा सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आल्या.
