नाशिक – नाशिकजवळील भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भगूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. नाशिकच्या विस्तारामुळे भगूर हे आता जवळपास नाशिकचाच एक भाग झाले आहे. भगूरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेणुकादेवीचे मंदिर. नवरात्रोत्सवात संपूर्ण गर्दीचा ओघ रेणुकादेवी मंदिराकडे वाहत असतो.

पुराणानुसार भृगू ऋषींनी दारणा नदीकाठी रेणुकामाता मंदिराची स्थापना केली. त्यावेळी तिला तपोवनाची देवी म्हणत असत. मंदिरासमोर आणि आसपास मोकळे पटांगण आहे. मंदिराजवळच दगडी पायऱ्यांची बारव (विहीर) आहे. बरेच भाविक या बारवमध्ये स्नान करूनच देवीच्या दर्शनाला जातात. या बारवमध्ये जिवंत झरा आहे. त्यामुळे मोटारीने पाणी उपसल्याबरोबर नवीन ताज्या पाण्याने बारव त्वरित भरते. या बारवमधील पाण्याने स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येथे स्नानासाठी येतात. देवीपुढील दिव्यातील तेलही त्वचारोगावरील औषध म्हणून भाविक श्रद्धेने लावतात, असे सांगितले जाते.

चांदीचा पत्रा देवीला वाहण्याची प्रथा येथे आहे. नवरात्रोत्सवात मंदिरापुढे घटी बसणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या लक्षणीय असते.अष्टमीला होमहवन, नवमीला कुळधर्म आणि दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. नवरात्रीनंतर कोजागरी पौर्णिमाही मंदिरात उत्साहात साजरी केली जाते. नवरात्रोत्सवात रेणुकादेवीची यात्रा भरते. ही यात्राही चांगलीच प्रसिद्ध आहे.

१९४१ मध्ये कापड व्यापारी धटिंगण यांच्या पूर्वजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. लष्कराच्या हद्दीत हे मंदिर आहे. पूर्वीचे कौलारू मंदिर खूपच लहान होते. भाविकांच्या आर्थिक मदतीने मंदिर समितीने २००२ मध्ये मंदिराचे नूतनीकरण केले. मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो. चिंगरे घराण्याकडे मंदिराचे पौराहित्य आहे. मंदिराव्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असल्याने अनेकांची पाऊले या ठिकाणी वळतात.

मूर्तीची वैशिष्ट्ये

भगूरच्या रेणुका देवीची मूर्ती पूर्णाकृती अष्टभुजाधारी आहे. देवीसमोर सिंह आणि कासव यांच्या प्रतिमा आहेत. मंदिरासमोर बारव आणि भुयारी मार्ग आहे.

भगूरला कसे याल ?

नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर भगूरचे रेणुकादेवी मंदिर आहे. नाशिकहून भगूर तसेच देवळाली कॅम्पकडे जाण्यासाठी सिटीलिंक शहर बससेवा उपलब्ध आहे. रेल्वेव्दारे येणारे भाविक नाशिकरोड रेल्वे स्थानकात उतरुन शहर बससेवा, रिक्षा, टॅक्सीने मंदिरापर्यंत जाऊ शकतात.