नाशिक – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने मतदान केंद्रस्तरीय समित्यांचे (बूथ समिती) जाळे अधिक मजबूत करीत प्रत्येक घरापर्यंत भाजपचा सदस्य पोहोचेल, याची जय्यत तयारी केली आहे. आतापर्यंत शहरात १०४७ मतदान केंद्रांपैकी ९६.५० टक्के बूथ समित्यांची स्थापना झाली. एका समितीत १२ सदस्यांचा समावेश असतो. याचा विचार करता साडेबारा हजारहून अधिक सदस्य १२२ प्रभागात सक्रिय होत आहेत. या कामगिरीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महानगरपालिकेवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. गतवेळी ज्या प्रभागात पक्षाचे नगरसेवक नव्हते, त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणले गेले. दुसरीकडे पक्षाची मतदान केंद्रस्तरीय यंत्रणा अर्थात बूथ समित्यांची बांधणी करण्यात आली. शहरात १०४७ मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्राच्या क्षेत्रात ही समिती कार्यरत होत आहे. शहरातील एकूण समित्यांपैकी ९६.५० टक्के समित्या स्थापन झाल्या आहेत. या समितीत मतदान केंद्राच्या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीचा समावेश केला जातो. १२ सदस्यीय समितीत दोन महिला बंधनकारक आहेत. उवर्रित सदस्यांमध्ये सर्वजातीय व्यक्तींचा समावेश राहील याकडे लक्ष दिले जाते.

गुजरातच्या धर्तीवर पक्षीय यंत्रणा सक्रिय केली जात असल्याचे पदाधिकारी सांगतात. निवडणूक आली म्हणून नव्हे तर, आयुष्यभर परिसरातील नागरिक तुमच्याशी जोडलेले राहतील म्हणून बूथ समित्यांची रचना करण्याचा संदेश दिला गेला आहे. प्रत्येक समिती दर पंधरवडा वा महिन्याला बैठक घेईल. केंद्राच्या परिसरातील घरे आपसात विभागून सदस्य त्या घरांपर्यंत पोहोचतील. आपल्या विचारांच्या लोकांचे समाजमाध्यमांत गट तयार करून शासकीय योजना. सरकारची कामगिरी त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. नागरिकांचे आधार कार्ड वा अन्य अडचणी सोडविण्यासाठी मदत करतील, असे सांगितले जाते. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बूथ समित्यांमार्फत घरोघरी पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित समित्यांचे काम लवकरच

शहरात ९६.५० टक्के बूथ समित्या केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले. उर्वरित साडेतीन टक्के बूथ समित्या आम्ही आठ दिवसांत पूर्ण करू, असे आश्वासन आम्ही दिल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, मंडळ अध्यक्षांच्या सोबतीने हे काम पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्याचे केदार यांनी नमूद केले.