नाशिक : स्थानिकांना विश्वासात न घेता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर, नाशिक पूर्वमधून भाजपविरोधात निवडणूक लढविणारे गणेश गिते यांना मुंबईत परस्पर भाजपमध्ये प्रवेश दिल्यावरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्याची पुनरावृत्ती शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी उपनेते सुनील बागूल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या प्रवेशावेळी टाळली जाणार आहे. प्रवेशोइच्छुकांनी भाजपच्या महानगर सुकाणू समितीच्या बैठकीत हजेरी लावून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रविवारी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बागूल, राजवाडे यांच्यासह काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांकडून विरोधी पक्षातील प्रामुख्याने ठाकरे गटातील माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याची स्पर्धा सुरू आहे. बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. तरीदेखील नाशिक पूर्वमधील बंडखोर गणेश गिते यांना भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश दिला गेला. नाशिक पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा असाच प्रवेश झाला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर बडगुजर यांनी पार्टी केल्याची चित्रफित प्रसारीत झाली होती. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या बडगुजरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कालांतराने तेही महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपवासी झाले. या प्रवेशांवरून स्थानिक पातळीवर चांगलाच गदारोळ उडाला होता. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह माजी नगरसेवकांनी बडगुजर यांना कडाडून विरोध केला. यासारखी स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून गिरीश महाजन यांच्याकडून काळजी घेतली जात आहे. त्यांच्या सूचनेनुसार प्रवेशोइच्छुकांनी भाजप महानगर सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भाजपच्या आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. ॲड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी गुन्हे, आता प्रवेश

विरोधी पक्षातील नेत्यांवर आधी गुन्हे दाखल करायचे आणि नंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करायचा, अशी कार्यपद्धती अवलंबवली गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार होत आहे. त्यासाठी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा दाखला दिला जातो. महिनाभरापूर्वी त्यांच्या विरोधात मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फरार असताना त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. ठाकरे गटाच्या आरोपांमुळे लांबणीवर पडलेला प्रवेश आता रविवारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होईल. दरम्यान, बागूल व राजवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने तक्रारदार गजू घोडके यांनी भूमिका बदलून तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले होते.