नाशिक – महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या फोन करो आंदोलनात विविध भागातील शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून ते विविध मंत्री, खासदार व आमदारांना फोन करून जाब विचारला. राहता तालुक्यातील एकाने राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधला.
कांद्याच्या घसरलेल्या दराकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च २२०० ते अडीच हजार प्रति क्विंटल असताना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, संघटनेने पुकारलेले फोन करो आंदोलन आठवडाभर चालणार आहे. या अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पणनमंत्री जयकुमार रावल, शिक्षणमंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, संजय शिरसाठ यांच्यासह अनेक आमदार, खासदारांना फोन केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. प्रारंभीच आंदोलनात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसला.
सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना फोन केले जात आहे. नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे भास्कर भगरे, धुळ्याच्या डॉ. शोभा बच्छाव, खा. नीलेश लंके, खा. संदीपान भूमरे या खासदारांना शेतकऱ्यांनी फोन केले. कांदा दरवाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले, याबद्दल विचारणा केली. कांदा निर्यात होण्यासाठी अनुदान आणि इतर उपाययोजनांची आवश्यकता मांडली जाते. मागील काही महिन्यांमध्ये कमी दराने कांदा विकावा लागला. त्यापोटी अनुदान, नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा स्वस्त किंमतीत बाजारात आणू नये, अशा मागण्या मांडून कांदा दरवाढीसाठी ठोस भूमिका घेण्याचा आग्रह धरला जात आहे. या संवादाच्या ध्वनिफिती शेतकऱ्यांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित होऊ लागल्या आहेत. सातत्याने येणाऱ्या फोनवर उत्तर देताना मंत्री व लोकप्रतिनिधींची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील योगेश वाणी या शेतकऱ्याने राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना फोन करून बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदे लावल्याचे नमूद केले. उत्पादन खर्चापेक्षा अतिशय कमी भाव मिळत आहे. शेतकरी संघटनेतील पदाधिकारी कृषिमूल्य आयोगावर जाऊन काय उपयोग झाला, अशी विचारणा केली. यावर पाशा पटेल यांनी कांद्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून राज्याचे पणनमंत्री व इतरांचे शिष्ट मंडळ घेऊन लवकरच केंद्राकडे जाणार असल्याचे नमूद केले. आपण कार्यक्रमात असून नंतर फोन करतो असे सांगत पटेल यांनी संपर्क खंडित केला.