नाशिक – पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर सभागृहाच्या नुतनीकरणावर स्मार्ट सिटी कंपनीने तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून त्याचे रुप पालटले. परंतु, चकचकीत दिसणाऱ्या या सभागृहात सहजपणे आसनस्थ होता येत नाही. रांगेतील एखाद्या खुर्चीपर्यंत पोहचणे वा, आसनस्थ झाल्यानंतर बाहेर पडणे जिकिरीचे ठरते. अशा स्थितीत कसेबसे खुर्चीपर्यंत पोहोचले की, भरदिवसाही थंड हवेचा मार मुकाट्याने सहन करीत बसावे लागते.
स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांतील उणिवांची अनुभूती राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतली. नाशिक-त्र्यंबकेश्वर प्राधिकरणच्यावतीने रविवारी पंडित पलुस्कर सभागृहात कुंभ मंथनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास क्रेडाई, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, आयएमए, लघु उद्योग भारती, वाहतूकदार आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंडित पलुस्कर सभागृह हे १५० आसन क्षमतेचे आहे. आलेल्यांना सभागृहात आसनस्थ होताना कसरत करावी लागली. सभागृहातील खुर्च्यांवर आधी काही जण स्थानापन्न झाले होते. नव्याने आलेल्यांना आतील रिकाम्या खुर्च्यांवर जाता येत नव्हते. खुर्चीच्या मागील-पुढील रांगेत ये-जा करण्यास जागा नाही. बसणाऱ्यांचे गुडघे समोरील खुर्चीला टेकतात. यातून आतील रिक्त खुर्च्यांकडे जाताना अनेकांची कसरत सुरू होती. हे लक्षात आल्यानंतर मंत्री महाजन यांनी रांगेत एका बाजुला बसणाऱ्यांना आतील खुर्च्यावर बसण्याची विनंती केली, जेणेकरून नव्याने येणाऱ्यांना अलीकडील खुर्चीवर बसता येईल.
सभागृहात दोन्ही बाजुच्या खुर्चीच्या रांगेत ये-जा करण्यासाठी मध्यभागी एकच मार्ग आहे. त्यामुळे कुठल्याही रांगेतील कोपऱ्याकडील भागात बसलेल्यांना दाटीवाटीच्या व्यवस्थेमुळे बाहेर पडणे मुश्कील ठरते. सभागृहाची अंतर्गत रचना विचित्र असली तरी वातानुकूलीत यंत्रणा मात्र अधिक क्षमतेची असेल. कारण, दिवसाही सभागृहात अक्षरश: हुडहुडी भरते. परंतु, बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. नाट्य मंदिर आणि सांस्कृतिक सभागृहांची व्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी पलूस्कर सभागृहात अतिशय दाटीवाटीची रचना असल्याचे मान्य केले.
स्मार्ट सिटी कंपनीने इंद्रकुंड भागातील पंडित पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरण केले होते. यासाठी जवळपास दोन कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले. नूतनीकरणामुळे नाशिककरांना सौंदर्यात्मक अनुभूती मिळेल, असा विश्वास स्मार्ट सिटी कंपनीकडून व्यक्त झाला होता. परंतु, सभागृहात त्या विपरित अनुभव येत आहे. प्रचंड निधी खर्च होऊनही प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागतो. मध्यंतरी या सभागृहाच्या खासगीकरणाचा निर्णय सांस्कृतिक संघटनांच्या विरोधामुळे प्रशासनाला मागे घ्यावा लागला होता.