नाशिक : वाढती गुन्हेगारी आणि त्यातून निर्माण होणारी दहशत रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे. परिमंडळ दोन अंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून, त्यांच्यावर अनुक्रमे चार आणि तीन गुन्हे दाखल आहेत.

शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेच्या जिवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने पोलिसांकडून दोन किंवा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीचीच कारवाई केली जात आहे. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रुतिक उर्फ गजाळ्या रकताटे (२३, रा. पाटील नगर) याच्यावर चार गंभीर गुन्हे नोंद आहेत. तर देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील भीमराव डांगळे (४०, रा. देवळाली कॅम्प) याच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद असून, दोघांनाही दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे.

येत्या सण-उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संभाव्य गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे. परिमंडळ एकमध्ये आतापर्यंत १४ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली असून, अलीकडेच दोन जणांना तडीपार करण्यात आले. आता परिमंडळ दोनमध्येही ही कारवाई वेग घेत आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळनिहाय यादी तयार करून कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरही कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समाजकंटकांविरोधात नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून खून, टोळक्याचा धुडगूस, हाणामारी असे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा अनेक प्रकरणात संशयितांमध्ये अल्पवयीनांचा समावेश असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जाते. संबंधितांवर कारवाईला मर्यादा येतात.  काही भागात गुन्हेगारी टोळक्यांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात आहे.

पादचारी महिलांचे मंगळसूत्र खेचून नेण्याचे सत्र कायम आहे. गुन्हेगारी वाढत असताना पोलीस यंत्रणेकडून कठोर भूमिका  घेतली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते.  दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर तडिपारीच्या कारवाईने गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याची तयारी यंत्रणेने केली आहे. आगामी सणोत्सव आणि महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कारवाईला वेग दिल्याचे चित्र आहे.