नाशिक – जोरदार विरोध केल्यानंतरही भाजप श्रेष्ठींनी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नाशिक येथील वादग्रस्त माजी पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिल्याने नाराज भाजपच्या आमदार सीमा हिरे या अजूनही बडगुजर यांच्याशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. खुद्द बडगुजर यांनीच याविषयी अप्रत्यक्षरित्या जाहीर नाराजी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर व्यक्त केली.
मागील विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने भाजपच्या सीमा हिरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक प्रचारात भाजप नेत्यांनी बडगुजर यांच्यावर देशद्रोही असल्याचीही टीका केली होती. निवडणूक निकालानंतर महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर सर्वच राजकीय चित्र बदलले. भाजपचे नेते ज्या बडगुजर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान तुटून पडले होते. त्याच बडगुजर यांना भाजपने हसत खेळत आणि झालं गेलं गंगेला मिळालं, असे म्हणत पक्षात प्रवेश दिला.
बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, यासाठी आमदार सीमा हिरे यांनी भरपूर विरोध केला. परंतु, उपयोग झाला नाही. मंत्री गिरीश महाजन हे बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासाठी अधिक आग्रही होते. सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे या दोघांचा मतदारसंघ नाशिक पश्चिम आहे. बडगुजर भाजपमध्ये आले तरी अद्याप सीमा हिरे यांच्याशी असलेल्या संबंधात कोणतीही सुधारणा झालेली नाही.
शुक्रवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक पश्चिम मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुधाकर बडगुजर यांनी याविषयी थेट नाव न घेता सीमा हिरे यांच्यावर टीका केली. त्यास निमित्त ठरले बडगुजर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास सीमा हिरे यांच्या अनुपस्थितीचे. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे अनुपस्थित राहिल्या. या कार्यक्रमाआधी मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बडगुजर यांच्या कार्यक्रमाला महाजन हे काहीसे उशीरा आल्याने कार्यक्रम सुरु होण्यासही उशीर झाला. त्यामुळेही बडगुजर अस्वस्थ झाले होते. ही अस्वस्थता शेवटी त्यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर व्यक्त केली.
सहनशील असल्याने आपण काही बोलत नव्हतो. परंतु, कोणीतरी आज मुद्दाम उशीर करणारच, हे आपणास माहित होते, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. अर्थात त्यांचा संपूर्ण रोख सीमा हिरे यांच्यावर होता, हे सर्वांच्या लक्षात आले. आम्ही त्यांना ताई म्हणतो. आज त्या इथे आल्या असत्या तर बरे झाले असते, असे बडगुजर यांनी नमूद केले. काही जणांचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत. आम्ही तोंड उघडले तर काय होईल माहीत नाही. आपण कोणाच्या वाट्याला जात नाही. परंतु, कोणी अंगावर आला तर तुम्ही सांगितल्यास भाऊ त्याला शिंगावर घेईन, असा इशाराही बडगुजर यांनी दिला.