नाशिक : मे महिन्यात पाऊस सुरु झाल्यापासून खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या नाशिककरांच्या सहनशीलतेची कमालच म्हणावी लागेल. शहरात सध्या असा एकही रस्ता नसेल, ज्याला खड्डा नसेल. विशेष म्हणजे, नाशिकच्या नागरिकांवर दररोज खड्ड्यांमधून वाट काढण्याची वेळ आली असताना शहरातील भाजपचे तीनही आमदार असोत, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार असोत. सत्ताधारी महायुतीकडून कोणीही खड्ड्यांविषयी आवाज उठविण्यासाठी पुढे आले नसल्याने नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूकही खड्डेमय रस्त्यांतूनच नेण्याची वेळ आली. अखेर, याविषयी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना बोलणे भाग पडले.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. एकिकडे कुंभमेळ्याच्या तयारीचा गाजावाजा होत असताना शहरात मात्र खड्डेमय रस्ते नाशिकच्या नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. महात्मा गांधी रोड, स्मार्ट रोड, मेनरोड यांचा काहीसा अपवाद वगळता शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्डेमय रस्त्यांमधून वाट काढताना वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
नाशिकच्या रस्त्यांची अशी अवस्था झाली असताना महायुतीच्या चारही आमदारांपैकी तसेच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून हा विषय आक्रमकपणे मांडला गेला नाही. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, एकमेकांच्या वाहनांना धक्का लागून वादावादी, असे प्रकार होत आहेत. कित्येक दिवसांपासून नाशिकचे नागरिक हा त्रास सहन करत असताना किमान गणेशोत्सवात तरी शहरातील खड्डे बुजविले जातील, अशी नाशिककरांना अपेक्षा होती. परंतु, सतत सुरु असलेल्या पावसाचे कारण पुढे करत खड्डे बुजविणे टाळले गेले. सार्वजनिक गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत विसर्जन मिरवणूक मार्गासह प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले गेले होते. तथापि, अनंत चतुर्दशीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झालीच नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्येही नाराजी निर्माण झाली. दुरुस्ती न झालेल्या मार्गानेच विसर्जन मिरवणूक नेण्यात आली.
सत्ताधारी महायुती खड्ड्यांप्रश्नी गप्प राहणे आगामी महापालिका निवडणुकांमुळे परवडणारे नसल्याचे लक्षात घेत मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजविण्याचे काम होऊ शकले नसल्याचे सांगितले. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी आहे. तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवल्यास पावसाच्या पाण्यात खड्ड्यांमध्ये टाकलेली माती, कच वाहून जाऊ शकते. त्यामुळे विसर्जनानंतर, पावसाने उघडीप घेताच सर्व विभागात रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. रस्ता दुरुस्तीसंदर्भातील निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश दिले गेले आहेत. नाशिकला खड्डेमुक्त केले जाईल, असे आश्वासन महाजन यांना देणे भाग पडले. गिरीश महाजन नाशिकच्या खड्डेमय रस्ते दुरुस्तीविषयी जळगाव सोडून नाशिकमध्ये दोन दिवस का होईना मुक्कामी राहण्याची तयारी दर्शवित असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महायुतीचे पदाधिकारी यांनी या विषयावर आधीच भूमिका जाहीर करणे आवश्यक होते, असे म्हटले जात आहे.