नाशिक : ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने चांदवड, पेठ, इगतपुरी, पवारवाडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थ तसेच गुटख्याची होणारी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर छापा टाकत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मगर यांना चांदवड शहरातील लेंडीहाटी परिसरात गांजा विकला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत राहुल पवार (२४, रा. लेंडीहाटी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन किलो २४ ग्रॅम वजनाचा ६० हजार ४८० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुध्द चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पेठ परिसरात चिकाडी ते भनवड रस्त्यावरील एका मोटारीची तपासणी करुन मालक पांडुरंग बागूल (३८, रा. मोखनळ) यास ताब्यात घेतले. मोटारीसह गुटखा असा सहा लाख, चार हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बागूलविरूध्द पेठ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इगतपुरी येथे मुज्जमील सय्यद (३५) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या ताब्यातून १५ हजार रुपयांचा गांजा, भ्रमणध्वनी असा ३६ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मालेगाव शहराजवळील पवारवाडी परिसरात कल्लु स्टेडियमजवळून मोहंमद नईम (२०, रा. नवी वस्ती), मोहमद इस्लाम (रा. गोल्डननगर) या दोघांकडून गुंगीकारक अल्प्राझोलम गोळ्यांचा चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.